आगरदांडा विद्युत उपकेंद्राची उभारणी रखडली!

By Admin | Updated: May 16, 2014 01:45 IST2014-05-16T01:45:40+5:302014-05-16T01:45:40+5:30

मुरुड हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र व्हावे तसेच येणार्‍या पर्यटकांना वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा पुरविता याव्यात याकरिता स्थानिक नगरपरिषद पाठपुरावा करीत आहे

Agadanda Electrical Sub-station set up! | आगरदांडा विद्युत उपकेंद्राची उभारणी रखडली!

आगरदांडा विद्युत उपकेंद्राची उभारणी रखडली!

>मेघराज जाधव, मुरूड - मुरुड हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र व्हावे तसेच येणार्‍या पर्यटकांना वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा पुरविता याव्यात याकरिता स्थानिक नगरपरिषद पाठपुरावा करीत आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून मुरुड तालुक्यासाठी प्रस्तावित असलेला आगरदांडा विद्युत उपकेंद्र उभारणीचा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे. मुरुड तालुक्याचा विजेचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी विद्युत उपकेंद्र उभारणीसह अनुषंगिक दुुरुस्तीसाठी तत्कालीन ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी १०० के.व्ही. विद्युत उपकेंद्रासाठी ८० लाखांचा निधी देण्याची घोषणा केली होती. २६ जानेवारी २००९ रोजी पूर्वी वीजप्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश मंत्र्यांसमवेत उपस्थित महावितरण अधिकार्‍यांना दिले होते. त्यावेळचे नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी निवेदने, मोर्चा आदी आयुधांच्या माध्यमातून १०० के.व्ही. उपकेंद्राला मंजुरी मिळावी, उच्चदाब न मिळणे, ५० वर्षांपूर्वीचे निकामी फॅब्रिकेटर्स, कॅपसिटर्स, कंडक्टर्स, जीर्ण पोल बदलण्यासाठी दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांनाच साकडे घातले होते. मुरुड हे एका टोकाला असून रोहा तालुक्यातील धाटाव येथून ६५ किमी अंतर पार करुन जंगलातून झाडाझुडपांतून विद्युत पुरवठा होत असतो. नेहमी कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने येथील हॉटेल, लॉजिंग व्यावसायिकांचा जीव नेहमी टांगणीला असतो. सतत विद्युत उपकरणांची मोठी हानी होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागल्याने आता जिल्हा प्रशासन जागे झाले. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व पेणचे अधीक्षक अभियंता यांची संयुक्त बैठक झाली. आगरदांड्याला डोंगर माथ्यावर विद्युत उपकेंद्र उभारणीचा प्रस्तावित खर्च १० कोटी आणि डोंगर सपाटीकरणासाठी उणेपुरे १० कोटी खर्च लागेल, असे २०११ साली अधीक्षक अभियंता नीलकंठ वाडेकर यांनी बैठकीत माहिती देताना सांगितले. या उपकेंद्राचा लाभ कितीतरी जास्त दिघी पोर्ट कंपनीला होऊ शकतो. या गोष्टीला चार वर्षे उलटून गेली तरी विद्युत उपकेंद्राचा विषय अजेंड्यावर येत नाही, ही चिंतेची बाब आहे. पाबरावरुन ४० कि.मी. अंतरावरुन थेट २२ के.व्ही.ची विद्युत जोडणी मुरुडला येऊ घातली आहे, अशी प्रत्यक्ष कार्यवाही नाही. एवढेच काय परंतु मुरुड शहरानजीक असलेल्या शिघ्रे परिसरात ‘स्विचिंग स्टेशन’साठी दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी जागेचे सिलेक्शन झालेले नाही. या पर्यटनस्थानी अंबोली धरणामुळे पुरेसा पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे मुरुडकर समाधानी आहेत. परंतु उपकेंद्र लवकरात लवकर होण्याची मागणी वीज ग्राहकांकडून होत आहे.
 

Web Title: Agadanda Electrical Sub-station set up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.