वीजपुरवठा आठवड्यानंतरही खंडितच
By Admin | Updated: June 25, 2015 00:35 IST2015-06-25T00:35:37+5:302015-06-25T00:35:37+5:30
बोर्लीपंचतनसह दिवेआगर व इतर एकूण १५ गावांचा वीजपुरवठा आठवडाभरापासून खंडित असून श्रीवर्धन वीज कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा

वीजपुरवठा आठवड्यानंतरही खंडितच
बोर्लीपंचतन: बोर्लीपंचतनसह दिवेआगर व इतर एकूण १५ गावांचा वीजपुरवठा आठवडाभरापासून खंडित असून श्रीवर्धन वीज कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करताना नाकीनऊ आले आहे. आठवडाभर वीज नसल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
गोंडघर सबस्टेशनवर येणाऱ्या मुख्य वीजवाहिनीच्या खांबांचे काम गेल्यावर्षी पूर्ण झाले, परंतुु ते काम निकृष्ट झाल्याने दरवर्षी वाऱ्याने खांब कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. आताही त्यातील काही खांब पडल्याने गोंडघर सबस्टेशनकडे येणारा विद्युत प्रवाह खंडित आहे. तत्काळ काम सुरू न केल्याने वीज कधी येणार याबाबतीतही साशंकता असून लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नांकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
याबाबतीत गोरेगाव येथील कार्यकारी अभियंता उकये म्हणाले की, आमची सर्व यंत्रणा युध्दपातळीवर उद्यापासून कार्यरत होईल, म्हणजे याआधी जनता आठवडाभर अंधारात व दैनंदिन कामकाज ठप्प आहे याचे त्यांना काहीच सोयरसुतक नव्हते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बोर्लीपंचतन विभागात गेला आठवडाभर खंडित वीजपुरवठ्यामुळे येथील जनतेची दैनंदिन कामे ठप्प पडली आहेत. मात्र याकडे गांभीर्याने पाहण्यास लोकप्रतिनिधींना वेळ नाही. स्थानिक नेतेमंडळी मोबाइलवर संपर्क साधून विजेबाबत चौकशी करून विषय संपवतात. यावर ठोस पावले त्यांच्याकडून उचलली जात नाहीत तर ग्रामपंचायतही याबाबत वरीलप्रमाणे भूमिका घेत असल्याने जनतेमधून नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)