काही दिवसापूर्वी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत दाखल झाला होता. ऐन गणेशोत्सवात मुंबईत मोर्चा झाला. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. या जीआरला ओबीसी समाजाकडून विरोध सुरू झाला आहे. दरम्यान, आता लवकरच ओबीसी समाजाकडून मुंबईत मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दसऱ्यानंतर ओबीसी समाजाकडून मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा ८ किंवा ९ ऑक्टोंबर रोजी निघणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत ओबीसी नेत्यांच्या बैठका झाल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
या मोर्चाबाबत अंतिम निर्णय आज बैठकीत होणार आहे. मंत्री छगन भुजबळ आज या बैठकीत ऑनलाइन उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.
मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारचे कौतुक करतानाच, धोका दिल्यास सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. विखे पाटील चांगले काम करत आहेत आणि मराठ्यांच्या हितासाठी जो मंत्री झटून काम करेल, त्याच्यासाठी मराठा समाज कायम उभा राहील, असेही ते म्हणाले.
आज होणाऱ्या मराठा उपसमितीच्या बैठकीबद्दल माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. "एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब चांगले काम करत आहेत. पण, आम्हाला धोका दिल्यास आम्ही सोडणार नाही, हे तितकेच खरे आहे," असे ते म्हणाले.
मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या
जरांगे पाटील म्हणाले की, मराठवाड्यातील सर्व मराठा कुणबी आहेत. त्यामुळे सर्वांना कुणबी प्रमाणपत्रे मिळाली पाहिजेत. "तुम्ही फक्त प्रक्रिया सुरू करा, आम्हाला काही अडचण नाही. हैदराबाद गॅझेटिअर स्पष्ट सांगते की, मराठवाड्यातील मराठा कुणबी आहे. एकदा प्रमाणपत्रे येणे सुरू झाली की ती अखंडितपणे सुरूच ठेवा, मध्येच थांबू नका," अशी मागणी त्यांनी केली. विखे पाटील यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत ते म्हणाले की, विखे पाटील यांचा समाज नक्कीच आभारी राहील, पण एकही मराठा सुटता कामा नये.