Join us  

मुंबईकरांचा विजय असो; महानगरीला बदनाम करणारं 'महागुरुं'चं 'मुंबई अँथम' हटवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 6:54 PM

सगळ्यांना सामावून घेणारी, कुणालाही उपाशी न ठेवणारी, नशिबं चमकवणारी ही मुंबई प्रत्येकासाठीच 'आमची मुंबई' आहे. ती 'My मुंबई'पेक्षा 'माय (आई) मुंबई' आहे.

मुंबई... महानगरी - मायानगरी. महाराष्ट्राची राजधानी - भारताची आर्थिक राजधानी. या शहराला एक वैभवशाली इतिहास आहे, वैशिष्ट्यपूर्ण भूगोल आहे आणि अर्थातच उज्ज्वल भविष्यही. 'मुंबई नगरी बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका...' अशा शब्दांत पठ्ठे बापूराव यांनी या स्वप्ननगरीचं वर्णन केलं होतं. अलीकडच्या काळात 'डबलसीट' सिनेमातल्या 'मोहिनी' गाण्यातूनही मुंबापुरीच्या वैशिष्ट्यांची झलक पाहायला, अनुभवायला मिळाली होती.  

चंद्रा सूर्याची टिकली माथ्यावरतीसाऱ्यांची नशीबे हाती घेऊन फिरतीमायानगरी आहे की आहे जंतर मंतरबारा महिने चालू आत कुठलं यंतरतू दिल के दर्या कि रानीलहरे तेरी है तुफानी  

ही लावणी सगळ्या मुंबईकरांना भावली होती. कारण, सगळ्यांना सामावून घेणारी, कुणालाही उपाशी न ठेवणारी, नशिबं चमकवणारी ही मुंबई प्रत्येकासाठीच 'आमची मुंबई' आहे. ती 'My मुंबई'पेक्षा 'माय (आई) मुंबई' आहे. म्हणूनच, या मुंबईचं नाव बदनाम करणाऱ्यांना त्यांनी आज जबरदस्त हिसका दाखवला आहे आणि 'मुंबई अँथम' या नावाने यू-ट्युबवर झळकलेलं अत्यंत घाणेरडं, ओंगळवाणं गाणं शेमारूला मागे घ्यायला भाग पाडलंय. या 'स्पीरिट'बद्दल मुंबईकरांना सलाम!

अत्यंत तोकडे कपडे घातलेली एक उघडीवाघडी ललना विचित्र अंगविक्षेप करतेय, तिच्या अवतीभवती चार-पाच तरुण डोलताहेत आणि मराठीजनांमध्ये 'महागुरू' म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर - वय आणि आपल्या प्रतिष्ठा-प्रतिमेची जाणीव न ठेवता मुंबईची अक्षरशः नाचक्की करणारं गाणं गात नाचताहेत, असा व्हिडिओ काल यू-ट्युब चॅनलवर पोस्ट झाला आणि काही तासांतच इंटरनेटवर खळबळ उडाली. कट्टर मुंबईकरांनी या व्हिडीओचे वाभाडे काढायला सुरुवात केली आणि मराठीजन महागुरूंवर तुटून पडले. 

'मुंबई अँथम' असं शीर्षक दिल्यानं आणि पहिल्याच दृश्यात सचिन पिळगावकर दिसल्यानं काहीतरी चांगलं पाहायला मिळेल, असं मुंबईकरांना वाटलं होतं. पण झालं भलतंच. गाणं जसं पुढे सरकत गेलं, तसं ते अधिकच भीषण होत गेलं आणि आपोआपच डोक्यात गेलं. देशातूनच नव्हे, तर जगातून व्हिडीओवर 'डिसलाईक'चा मारा झाला. हा क्षोभ पाहून शेमारूला व्हिडीओ मागे घेण्यावाचून पर्यायच राहिला नाही. हे मुंबईकरांचं यशच म्हणावं लागेल. हा व्हिडीओ आपण खपवून घेतला असता, तर असे आणखी व्हिडीओ अपलोड झाले असते. पण, या हिसक्यानंतर असं धाडस कुणी करणार नाही. फक्त निर्मातेच नव्हे, तर अभिनेते - कलाकारही विचार करूनच प्रोजेक्ट स्वीकारतील, हे नक्की. 

शेमारूनं हा व्हिडीओ मागे घेतला आहे. ज्यांनी तो पाहिलेला नाही, त्यांना या विषयाचं गांभीर्य कळावं म्हणून त्याची एक झलक आम्ही दाखवत आहोत. 

टॅग्स :सचिन पिळगांवकरसोशल व्हायरल