नूतनीकरणानंतरही उद्यानाची अवस्था जैसे थे
By Admin | Updated: May 13, 2014 05:27 IST2014-05-13T05:27:19+5:302014-05-13T05:27:19+5:30
मुंबई उद्यानाच्या नूतनीकरणाला तीन महिनेही होत नाही तोच उद्यानात गर्दुल्ल्यांचा अड्डा भरतो आहे. शेजारी असलेल्या दुसर्या उद्यानात जागोजागी कचर्याचे ढीग जमा झाले आहेत.

नूतनीकरणानंतरही उद्यानाची अवस्था जैसे थे
जयाज्योती पेडणेकर, मुंबई उद्यानाच्या नूतनीकरणाला तीन महिनेही होत नाही तोच उद्यानात गर्दुल्ल्यांचा अड्डा भरतो आहे. शेजारी असलेल्या दुसर्या उद्यानात जागोजागी कचर्याचे ढीग जमा झाले आहेत. झाडे असूनही ती नसल्यासारखी स्थिती आहे; ही अवस्था आहे बोरीवली येथील गोराई सेक्टर-२ मधील उद्यानांची. बोरीवली पश्चिम येथील गोराई सेक्टर २ आरएससी२१, आरएससी४६ येथील स्मशानभूमीलगत असलेली पालिकेचे दोन उद्याने एकमेकांलगत आहेत. मात्र या उद्यानांमध्ये ज्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत त्यांची देखभाल व्यवस्थित होत नाही. परिणामी उद्यानांची दुरवस्था झाली आहे. येथील एका उद्यानाचे तीन महिन्यांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले. परंतु या उद्यानातील कम्पाउंड वॉलच्या लोखंडी जाळ््या गर्दुल्ल्यांनी तोडून भंगारात विकल्या आहेत. उद्यानात बांधण्यात आलेले जॉगिंग ट्रॅकही असमांतर आहेत. त्यामुळे चालताना रहिवाशांना त्रास होतो आहे. उद्यानांच्या नूतनीकरणावेळी हिरवळ, झाडे लावण्यात आलेली होती. सद्य:स्थिती त्यांना पाणी नसल्याने ती सुकत चालली आहेत. परिणामी उद्यान ओसाड झाले आहे. दुसर्या उद्यानात एक हजार झाडे लावण्यासाठी पालिकेने एका ठेकेदाराला कंत्राट दिले होते. मात्र ठेकेदाराने फक्त बोटावर मोजण्याइतकी झाड लावली आहे. येथे कदंब जातीची झाडे न लावता इतर झाडे लावण्यात आली आहेत. प्रवेशद्वाराजवळ व उद्यानातील आतील भागात जागोजागी कचर्याचा व दारूच्या बाटल्यांचा ढीग साचला आहे. झाडांना पाणी न मिळाल्याने जी होती; नव्हती ती झाडेसुद्धा सुकली आहेत. संरक्षक भिंती, विजेच्या वायरी तुटून पडल्या आहेत. काही झाडे तोडून जाळण्यात आली आहे. दोन्ही उद्यानांमध्ये मरूम जातीचे जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आले होते; ते बांधल्या बांधल्या दोन दिवसांत तुटून पडले आहेत. त्यामुळे जॉगिंग ट्रॅकचीही दुरवस्था झाली आहे. दरम्यान, दोन्ही उद्यानांच्या देखरेखीसाठी पालिकेने दोन सुरक्षारक्षक नेमले आहेत. दोन्ही सुरक्षारक्षक वयोवृद्ध असल्याने गर्दुल्ल्ये त्यांना जुमानत नाहीत, अशी अवस्था आहे. पोलिसांना गर्दुल्ले १००-२०० रुपये देतात. त्यामुळे पोलीस त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाहीत, असा आरोपदेखील गोराईकरांनी केला आहे. मुलांना सुट्ट्या पडल्या असून त्यांना खेळण्यासाठी या उद्यानाचा उपयोग होत नसल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे.