Join us  

नाशिक, पुण्यानंतर राज ठाकरे हाती घेणार नवं मिशन; मनसेची जोरदार तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 7:16 AM

राज ठाकरे लवकरच विभागवार पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून, भांडुप येथील मेळाव्याने याची सुरूवात होणार आहे

मुंबई : आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि पुण्यातील संघटनात्मक बांधणीनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे. राज ठाकरे लवकरच विभागवार पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून, भांडुप येथील मेळाव्याने याची सुरूवात होणार आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले की, २३ ऑक्टोबरला भांडुपमध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पक्षप्रमुख राज ठाकरे संबोधित करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी, राजकीय रणनीती याबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करतील.  पालिका निवडणुकांसाठी मनसेत सध्या संघटनात्मक पातळीवर मोठ्या हालचाली सुरू आहेत. स्वतः राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह मनसे नेत्यांचे पुणे, नाशिकसह विविध जिल्ह्यांचे दौरे वाढले आहेत. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या पालिकांवर मनसेने लक्ष केंद्रीत केले आहे. तर मुंबई महापालिकेसाठी सहा महिन्यांपासूनच काम सुरु करण्यात आले आहे. नेत्यांकडे विभागवार जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. बैठकांचे सत्र सुरू आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसे