मुंबई : मुंबईतील हजारो कोटींच्या घोटाळ्यानंतर टोरेसचे पुढील टार्गेट श्रीलंका असल्याचे तपासात समोर येत आहे. यातील पसार आरोपी सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉर्न कार्टर आणि माजी संचालक ओलेना स्टोअनची हे त्यासाठी श्रीलंकेत जाऊन आल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यानुसार पाेलिसांचा तपास सुरू आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी टोरेसच्या कांदिवली शाखेत छापेमारी केली. जवळपास सहा हजार चौरस फुटांचे असलेल्या या कार्यालयाची घोटाळा समोर आल्यानंतर तोडफोड करण्यात आली होती. याच कार्यालयातून तपास पथकाने पैसे, दागिने जप्त केले आहेत. तीन तिजोरीही पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्या उघडण्यासाठी टेक्निकल टीमची मदत घेण्यात येत आहे.
तसेच कार्यालयातून गुंतवणूकदारांची कागदपत्रे, व्यवहारासंबंधित कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. तसेच काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही ताब्यात घेण्यात आली आहेत. त्याचा पाेलिसांकडून तपास केला जात आहे. आतापर्यंत ३ हजार ७०० अर्ज आर्थिक गुन्हे शाखेकडे आले असून, फसवणुकीचा आकडा ५७ कोटींवर पोहोचला आहे. दरम्यान, गुन्हे शाखेने टोरेसचा माजी संचालक असलेल्या इमरान जावेदविरुद्धही एलओसी जारी केली आहे. तो भारतीय आहे.
युक्रेनमधून टोरेसचे इन्स्टाग्राम हॅण्डल? गुन्हा दाखल झाल्यापासून टोरेसच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिशाभूल करणारे व्हिडीओ, पोस्ट शेअर करण्यात येत आहेत. या पोस्ट कुठून केल्या जात आहेत, याबाबत सायबर पथक शोध घेत आहे. टोरेसचे संस्थापक तसेच अन्य सहकारी युक्रेनचे रहिवासी आहेत. युक्रेनमधूनच हे अकाउंट हॅण्डल होत असल्याचाही संशय तपास अधिकाऱ्यांना आहे.
‘ते’ सीसीटीव्ही एआय जनरेटेड गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर टोरेसच्या सोशल मीडिया खात्यावरून कंपनीचा सीईओ तौफिक रियाज आणि सीए अभिषेक गुप्ता सर्व पैसे दागिने लुटून, दुकानाची तोडफोड करत पसार झाल्याचे सीसीटीव्ही शेअर करण्यात आले. टोरेसने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले हे सीसीटीव्हीचे चित्रण एआय जनरेटेड असल्याचा संशय पाेलिसांना आहे. त्यानुसार पोलिसांकडून याबाबत अधिक पडताळणी सुरू आहे.