Join us  

'धनंजय मुंडे, महेबुब शेखनंतर आता संजय राठोडप्रकरणीही का होत नाही कारवाई?'  

By महेश गलांडे | Published: February 27, 2021 3:57 PM

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन, पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप कारवाई का नाही, असे म्हटले. तसेच, महाविकास आघाडी सरकारकडून मंत्र्यांवरील आणि पक्षातील नेत्यांवर असलेल्या आरोपांची प्रकरणं दाबण्यात येत असल्याचं पाटील यांनी म्हटलं.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन, पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप कारवाई का नाही, असे म्हटले. तसेच, महाविकास आघाडी सरकारकडून मंत्र्यांवरील आणि पक्षातील नेत्यांवर असलेल्या आरोपांची प्रकरणं दाबण्यात येत असल्याचं पाटील यांनी म्हटलं.

मुंबई - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यासमोरील अडचणी आता वाढण्याची चिन्हे आहेत. (Unaccounted property case) बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस या प्रकरणी अधिक तपास करणार आहेत. (ACB files case against Chitra Wagh's husband Kishor Wagh). त्यासंदर्भात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. तसेच, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महाविकास आघाडी सरकावर टीकास्त्र सोडले. 

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन, पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप कारवाई का नाही, असे म्हटले. तसेच, महाविकास आघाडी सरकारकडून मंत्र्यांवरील आणि पक्षातील नेत्यांवर असलेल्या आरोपांची प्रकरणं दाबण्यात येत असल्याचं पाटील यांनी म्हटलं. धनंजय मुंडे प्रकरणात कुठलिही कारवाई झाली नाही, एका मंत्र्यांच्या जावयाला ड्रग्जमध्ये पकडलं, त्यावरही कारवाई नाही. एका मंत्र्याने कार्यकर्त्याला घरी जाऊन मारतो, त्याचीही कारवाई नाही. एका पक्षाच्या युवक अध्यक्षावर बलात्काराचा आरोप असूनही कुठलिही कारवाई झाली नाही. मात्र, पूजा चव्हाण प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या भाजपच्या चित्रा वाघ यांच्या पतीची चौकशी आत्ताच का सुरू होतेय, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच, कार्यकर्त्यांवर, पक्षाच्या नेत्यांवर अशाप्रकारच्या कारवाई करुन, आम्ही घाबरणार नाही. चित्रा वाघ या वाघीण आहेत, भाजपा पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठिशी आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितंल.    

चित्रा वाघ यांनीही लाचलुचपत प्रकरणात पतीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या नवऱ्याला गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रास दिला जातो. मलाही काही प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. आता नवी माणसं उभी करून माझ्यावरही काही गुन्हे दाखल होतील. मात्र मी याला घाबरत नाही. आता मीच तुम्हाला पुरून उरणार. पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार, रोज बोलणार आणि न्याय मिळेपर्यंत बोलत राहणार, असे प्रतिआव्हानच चित्रा वाघ यांनी दिले.

काय आहे प्रकरण

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना २०१६ मध्ये लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू होता. आता या प्रकरणाच्या तपासादरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता गुन्हा दाखल केला आहे. किशोर वाघ यांच्या विविध शहरात असलेल्या मालमत्तांपैकी ९० टक्के मालमत्ता ही बेहिशेबी मालमत्ता असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.  किशोर वाघ यांच्याकडे एक कोटींहून अधिकची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा दावा केला जात आहे. 

दरम्यान, या कारवाईवरून भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आक्रमभ भूमिका घेतल्याने राजकीय सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप भाजपा नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला त्यांच्याविरोधात बोललेले आवडत नाही. असे जर कुणी काही बोलले तर त्यांची जुनी प्रकरणे बाहेर काढली जातात. या प्रकरणात भाजपा हा चित्रा वाघ यांच्यासोबत आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.

टॅग्स :चंद्रकांत पाटीलपूजा चव्हाणगुन्हेगारीचित्रा वाघ