बंदीनंतरही बारमध्ये छमछम
By Admin | Updated: July 31, 2015 23:27 IST2015-07-31T23:27:03+5:302015-07-31T23:27:03+5:30
डान्स बारवर बंदी असतानाही शहरातील बारमध्ये छमछम सुरू आहे. आॅर्केस्ट्राच्या नावाखाली हे डान्स बार सुरू असून त्यावर कारवाईकडे पोलिसांची डोळेझाक होत आहे.

बंदीनंतरही बारमध्ये छमछम
- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
डान्स बारवर बंदी असतानाही शहरातील बारमध्ये छमछम सुरू आहे. आॅर्केस्ट्राच्या नावाखाली हे डान्स बार सुरू असून त्यावर कारवाईकडे पोलिसांची डोळेझाक होत आहे.
राज्यात डान्स बारवर बंदी लागू व्हावी यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांनी बंदीचे आदेश जारी केल्यानंतर बार मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार बारमधील अवैध धंदे बंद व्हावेत याकरिता नवा कायदा प्रस्तावित असल्याने तूर्तास तरी डान्स बार बंदच आहेत. असे असतानाही नवी मुंबईत मात्र बारमध्ये छमछम सुरू आहे. दहा वर्षांपूर्वी पनवेल परिसरात सुरू झालेल्या डान्स बारमुळे आर. आर. पाटील यांना डान्स बार बंदीचा निर्णय घ्यावा लागला. अखेरपर्यंत त्यांनी या निर्णयातून माघार घेतली नव्हती.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात पनवेल, कोपरखैरणे, शिरवणे, तुर्भे गाव, जुहूगाव याठिकाणी हे डान्सबार सुरू आहेत. बहुतांश बारमालकांनी आॅर्केस्ट्राच्या परवानगीचा आधार घेत हा प्रकार चालवला आहे. आॅर्केस्ट्रासाठी असलेल्या स्टेजवरच बारबाला नाचत असतात.
आयुक्तालय क्षेत्रात १५ हून अधिक बारमध्ये विनापरवाना डान्स सुरू आहेत. आॅर्केस्ट्रा बारमध्ये वादक, महिला गायक व महिला वेटर यांनाच परवानगी आहे. त्यानंतरही परवानगीपेक्षा जास्त महिलांना कामावर ठेवले जात आहे. माजी आयुक्त के. एल. प्रसाद यांच्या कार्यकाळात शहरात आॅर्केस्ट्रा बारला परवानग्या मिळालेल्या आहेत. त्याच काळात आॅर्केस्ट्रा व इतर बारमध्ये चोरी छुप्या डान्स बारला सुरवात झालेली आहे. (प्रतिनिधी)
१० बारवर कारवाई
जवळपास १० बारवर परिमंडळ १ चे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी विशेष पथकामार्फत कारवाई केली आहे. त्यामध्ये कोपरखैरणेतील आदर्श व वाशीतील मधुबन या बारचा समावेश आहे. त्यानंतरही डान्स बार सुरूच असल्याचे आश्चर्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आॅर्केस्ट्रा बारमध्ये वादक, महिला गायक व महिला वेटर यांनाच परवानगी आहे. त्यानंतरही परवानगीपेक्षा जास्त महिलांना कामावर ठेवले जात आहे.
- पूर्वी सर्वाधिक बार असलेल्या परिमंडळ २ मध्ये सध्या सुमारे २४ सर्व्हिस बार व ३ आॅर्केस्ट्रा बार आहेत. तर परिमंडळ १ मध्ये सुमारे ५० सर्व्हिस बार व १२ आॅर्केस्ट्रा बार सुरू आहेत. त्यापैकी १५ हून अधिक ठिकाणी स्थानिक पोलिसांची मर्जी सांभाळत डान्स बार सुरू आहेत.
बारमध्ये सर्व नियमांचे पालन करण्याच्या सक्त सूचना असून, स्थानिक पोलिसांकडून पाहणी देखील केली जाते. नुकतेच दोन बारचे परवाने देखील रद्द केलेले आहेत. त्यानंतरही डान्स बार सुरू असल्यास त्यावर कारवाईच्या सूचना केल्या जातील.
- विजय चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त. नवी मुंबई.