Mumbai Akashvani MLA Canteen: मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कँटिनमधील निकृष्ट जेवणावरुन शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राडा घातला. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनमध्ये कर्मचाऱ्याला सर्वांसमोर बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांचे वर्तन चुकीचे असल्याचे म्हटलं. त्यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.
निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याचा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कँटिनमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. कँटिनमधील कर्मचाऱ्यांनी शिळं जेवण दिल्याचा आरोप करत संजय गायकवाड यांनी मारहाण केली. या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी विधान परिषदेत उमटले. दुसरीकडे, अन्न आणि औषध प्रशासनाने आमदार निवासामध्ये जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई केली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने आकाशवाणी आमदार कॅन्टीन चालवणाऱ्या अजंता केटरर्सचा परवाना निलंबित केला आहे.
संजय गायकवाड यांनी मंगळवारी रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधून डाळ व भात खराब दिल्याचा आरोप केला. संजय गायकवाड यांनी कँटिनमधून खोलीमध्ये जेवण मागवलं होतं. मात्र कँटिनमधून पाठवण्यात आलेली डाळ निष्कृष्ट दर्जाची होती आणि तिचा वास येत होता. त्यानंतर संतापलेले संजय गायकवाड कँटिनमध्ये गेले आणि डाळीचा वास घेऊन बघ असं म्हणत त्यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. गायकवाड यांनी बुक्क्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली.