Join us  

मुंबईत ‘नाइटलाइफ’साठी प्रशासनाच्या हालचाली सुरू, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 7:31 AM

नाइटलाइफचा निर्णय मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई महापालिकेकडून संभाव्य जागांची यादी तयार केली जात आहे.

 मुंबई : नाइटलाइफचा निर्णय मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई महापालिकेकडून संभाव्य जागांची यादी तयार केली जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस यंत्रणेवर ताण पडेल, असे कारण देत आढावा घेण्याचा विचार रविवारीमांडला होता. मात्र, नाइटलाइफ अनिवासी भागात त्यातही निवडक ठिकाणी सुरू होणार असल्याने सुरक्षेचा मुद्दाही निकालात निघाला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यादृष्टीने सकारात्मक निर्णय होतील, अशा हालचाली सुरू आहेत.युवासेना प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी २६ जानेवारीपासून मुंबईतील बीकेसी, नरिमन पॉइंट आणि फोर्ट परिसरात प्रायोगिक तत्त्वावर नाइटलाइफ सुरू होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, या निर्णयाने पोलीस यंत्रणेवर ताण येणार असल्याने समग्र आढावा आवश्यक असल्याची भूमिका गृहमंत्री देशमुख यांनी मांडल्याने हा निर्णय पुन्हा प्रलंबित राहणार असल्याची चर्चा होती.मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका गृहमंत्र्यांनी सध्या घेतली आहे.नाइटलाइफ या शब्दामुळे नकारात्मक संदेश जात आहे. त्यामुळे शिवसेनेसह या निर्णयाच्या बाजूने असलेल्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक ‘मुंबई २४ तास’ हा शब्दप्रयोग केला जात आहे. रात्रीच्या वेळी अडीअडचणीत सापडलेल्या मुंबईकरांची या निर्णयामुळे सोय होणार आहे. या निर्णयाने पर्यटकांना मुंबईत थांबण्याची संधी मिळणार आहे. त्यातून व्यावसायिक उलाढाल वाढेल, रोजगार वाढून महसूल वाढेल, असा दावा याच्या समर्थकांकडून केला जात आहे.मुंबईतील कामकाज २४ तास चालते. त्यामुळे रात्रीच्या वेळीही जेवणापासून पर्यटकांना विविध वस्तूंची खरेदी करणे सोपे व्हायला हवे. रात्रीच्या वेळी परदेशातही मॉल, रेस्टॉरंट सुरू असतात, याचा विचार आपल्याकडेही होत असेल तर या संकल्पनेचे स्वागतच करायला हवे.- अनिल परब, परिवहन मंत्री

टॅग्स :नाईटलाईफमुंबईमहाराष्ट्र सरकार