स्वच्छतेबाबत प्रशासन उदासीन
By Admin | Updated: May 11, 2015 01:41 IST2015-05-11T01:41:29+5:302015-05-11T01:41:29+5:30
स्वच्छतेच्या बाबतीत उरण पूर्णपणे पिछाडीवर असून राईट टू पी चळवळ तसेच हागणदारीमुक्त परिसर स्वच्छ उरण अभियान अशा स्वच्छतेबाबत असणाऱ्या अनेक योजनांचा उरणमध्ये बोजवारा उडाला आहे.

स्वच्छतेबाबत प्रशासन उदासीन
उरण : करोडो रुपये खर्च करून शासनाने प्रत्येक गाव, प्रत्येक शहर, वाडीवस्ती हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला. मात्र शासनाकडूनच या योजनेकडे व जनतेच्या विकासकामांकडे दुर्लक्ष होत चालल्याने उरणमधील अनेक योजनांचा बोजवारा उडाला आहे. त्यातही स्वच्छतेच्या बाबतीत उरण पूर्णपणे पिछाडीवर असून राईट टू पी चळवळ तसेच हागणदारीमुक्त परिसर स्वच्छ उरण अभियान अशा स्वच्छतेबाबत असणाऱ्या अनेक योजनांचा उरणमध्ये बोजवारा उडाला आहे. सर्वात बिकट समस्या बनली ती उघड्यावरील शौचाला जाण्याची.
उरण तालुक्यातील अनेक कुटुंबे आजही उघड्यावर शौचाला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्या लोकांमध्ये उरणमधील सुटाबुटात वावरणारे तसेच इतरांना उपदेशाचे डोस देणाऱ्यांचाही समावेश असल्याने या समस्येला आता वेगळेच वळण लागत आहे. हागणदारीमुक्त करण्यासाठी आघाडी सरकारने उघड्यावर बसणाऱ्या, शौचालयाला जाणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करत गुड मॉर्निंग पथकाची स्थापना सुद्धा केली होती. पहाटेच्या वेळी गावागावांत जाऊन या पथकाने कारवाई केल्याने त्यावेळी अनेक नागरिकांनी धसका घेतला होता.
नागरिकांनी शौचालयाचा जास्तीत जास्त वापर करावा. यासाठी आजच्या सरकारने ४ हजार रुपयांचे अनुदान वाढवून १२ हजार केले आहे. या रकमेत चांगले शौचालय बांधून नागरिक त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करतील, असा शासनाचा मानस होता. आता या स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी स्वच्छता दूतांची निवड करण्यात येत आहे. मात्र एवढे करूनसुद्धा उरणमध्ये स्वच्छतेबाबत नागरिक उदासीन आहेत असेच चित्र दिसत आहे. तसेच पहिल्यासारखी कारवाई होत नसल्याने डोळे बंद करून सर्व काही पाहणारा व ऐकणारा शासन व समाजही याबाबतीत उदासीन असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)
उरणमध्ये अनेक ठिकाणी नवीन शौचालयाची ज्या प्रमाणात निर्मिती व्हायला हवी, ती होत नसल्यानेही अनेक समस्या उद्भवल्या आहे. शौचालयाची निर्मिती झाल्यास काही प्रमाणात का होईना हा प्रश्न सुटेल, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. स्वच्छतेतून सुंदरतेकडे असा संदेश देणारे फलक नावापुरतेच उरले आहे. एकंदरीत उरणमधील शासकीय यंत्रणा तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष कोणतेही प्रयत्न करत नसल्याचे उघड होत आहे.