Join us

६ हजार कोटीपैकी केवळ ३,५०० कोटी कर जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:08 IST

मालमत्ता कर गोळा करताना महापालिकेची दमछाक

मुंबई : मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असणाऱ्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे. चालू आर्थिक वर्षात सहा हजार २०० कोटी रुपयांचा कर गोळा करण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी आतापर्यंत तीन हजार ५८२ कोटी ६७ लाख रुपये (५८ टक्के) कर जमा झाला आहे. उर्वरित टार्गेट पूर्ण करण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे आहे. 

दुसरीकडे मालमत्ताधारकांपुढे पहिल्या टप्प्यातील कर भरण्यासाठी अवघे चारच दिवस आहेत. त्यामुळे अद्यापही कर न भरलेल्यांनी वेळीच कर जमा करून दंडात्मक व कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

१ एप्रिल २०२४ ते २६ डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण कर संकलन पाच हजार २४३ कोटी १६ लाख रुपये झाले आहे. मागील आर्थिक वर्षात  (२०२३-२४) मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत  २५ मे २०२४ पर्यंत होती. त्यामुळे मागील आर्थिक वर्षातील एक हजार ६६० कोटी रुपये रक्कमही यात समाविष्ट आहे. याचा अर्थ विद्यमान आर्थिक वर्षाचे (२०२४-२५) कर संकलन हे तीन हजार ५८२ कोटी ६७ लाख रुपये इतके झाले आहे.  

तर, एकूण आर्थिक वर्षाचे मालमत्ता कर संकलनाचे उद्दिष्ट्य हे सहा हजार २०० कोटी रुपये इतके आहे. त्या तुलनेत आतापर्यंत ५८ टक्के कर संकलन झाले आहे.

मुदतीपूर्वी कर भरा, अन्यथा दंड

३० डिसेंबरला सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत आणि ३१ डिसेंबरला सकाळी ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कर भरण्यासाठी पालिकेचे मुख्यालय, सर्व विभाग कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रे राहणार सुरू राहणार आहे. त्याचबरोबर शनिवार, २८ डिसेंबर रोजीही प्रशासकीय विभाग कार्यालय, तसेच नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात आले आहेत. कर भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.  

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई