Join us  

स्वबळावरच जिंकणार, शिवसेना देशपातळीवर नेणार, आदित्य ठाकरेंचा निर्धार  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 12:10 PM

स्वबळावर लढून महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणतानाच आगामी काळात शिवसेनेचा राज्याबरोबरच देशपातळीवर विस्तार करण्याचा निर्धार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी केला.

मुंबई - स्वबळावर लढून महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणतानाच आगामी काळात शिवसेनेचा राज्याबरोबरच देशपातळीवर विस्तार करण्याचा निर्धार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी केला. शिवसेनेने आतापर्यंत स्वतःची ताकद कधी जोखली नाही,पण यापुढे स्वबळावर लढायचं, जिंकायचं आणि एकहाती सत्ता आणायची आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.   

शिवसेनेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करतान आदित्य ठाकरे यांनी स्वबळाच्या नाऱ्याचा पुनरुच्चार करताना शिवसेनेचा राज्याबरोबरच देशपातळीवर विस्तार करण्याचे लक्ष्य समोर ठेवले.  आदित्य ठाकरे म्हणाले, "शिवसेनेने आतापर्यंत स्वतःची ताकद कधी जोखली नाही, पण यापुढे स्वबळावर लढून जिंकायचे आहे. पण त्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. शिवसैनिक तन आणि मन लावून लढतात. आता आपल्याला नुसती मतंच नाही तर जनतेची मनही जिंकायची आहेत."यावेळी शिवसेनेचा राज्याबरोबरच देशपातळीवर विस्तार करण्याचा निर्धारही आदित्य ठाकरेंनी केला. पालघर निवडणुकीच्या वेळी अख्ख्या देशाचं लक्ष शिवसेनेकडे होतं, बाकीचे चीटिंग करुन जिंकले, पण नैतिक विजय आपलाच झाला, असेही ते म्हणाले. शिवसैनिक आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यामध्ये फरक आहे. इतर पक्ष आपले एकढे सदस्य आहेत असा दावा करतात. पण संकटकाळी शिवसैनिकच धावून जाता. अडीअडचणीच्या वेळी शिवसैनिक जात धर्म न पाहता मदतीला जातो, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.   

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाराजकारणमहाराष्ट्र