Join us  

आदित्य ठाकरे अभिनेत्रीला तिकीट देण्यासाठी इच्छुक; भाजपा आमदाराची 'अंदर की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 2:42 PM

शिवसेना उबाठा पक्षाकडून अभिनेत्रीला मुंबईच्या मैदानात उतरवलं जाणार असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा पुढील काही दिवसांत होणार आहे. तत्पूर्वी राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा होताना दिसत आहे. शिवसेना उबाठा पक्षाकडून मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, भाजपानेही मुंबईतील दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये उत्तर मुंबईतून केंद्रीयमंत्री पियुष गोयल आणि ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, मुंबईत भाजपा आणि शिवसेना उबाठा यांच्यातच जोरदार सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच, मुंबईतील एका जागेवर उबाठा पक्षाकडून अभिनेत्रीला तिकीट देण्यासाठी आदित्य ठाकरे इच्छुक असल्याचं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे. 

शिवसेना उबाठा पक्षाकडून अभिनेत्रीला मुंबईच्या मैदानात उतरवलं जाणार असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. त्यासाठी, आदित्य ठाकरे इच्छुक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, ही अभिनेत्री कोण, आणि कोणत्या मतदारसंघातून उमेदवार असेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. 

''लोकसभा निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे मुंबईमध्ये एका अभिनेत्रीला निवडणुकीचं तिकीट देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.उबाठा गटातील कार्यकर्त्यांचा मात्र त्याला विरोध आहे. आता उरलेल्या निष्ठावंतांना डावलून आदित्य अभिनेत्रीला लोकसभेचं तिकीट मिळवून देतो हे बघायचंय?,'' असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, यावेळी आदित्य ठाकरेंचा पेंग्वीन असा उल्लेख करत, त्यांनी बोचरी टीकाही केली. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांचे बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अनेक कार्यक्रमात ते सेलिब्रिटींना भेटतात. तर, काही वर्षांपूर्वी अभिनेत्री दिशा पटाणींसोबतचा त्यांचा फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यामुळे, त्यांच्या मनातील अभिनेत्री कोण, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

मुंबईत लोकसभेच्या ६ जागा

दरम्यान, मुंबईत लोकसभेच्या ६ जागा असून मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य असे ६ मतदारसंघ मुंबईतून येतात. त्यामुळे, नेमकं कोणत्या मतदारसंघातून अभिनेत्रीला तिकीट देण्यासाठी आदित्य ठाकरे इच्छुक आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघांतून आमदार आहेत, त्यांचा वरळी मतदारसंघा हा दक्षिण मुंबई मतदारसंघात येतो. त्यामुळे, त्यांच्या मतदारसंघातून अभिनेत्रीला उमेदवारी देण्यासाठी ते इच्छुक आहेत का, इतर कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी देण्यास इच्छुक आहेत, असाही प्रश्न अनुत्तरीत आहे.   

टॅग्स :आदित्य ठाकरेभाजपाशिवसेनामुंबईलोकसभा