Join us  

इंग्लंडप्रमाणे महापालिका शाळा 'ग्रामर स्कूल' करणार, आदित्य ठाकरेंची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 6:22 PM

Aditya Thackeray : इंग्लंडप्रमाणे महापालिका शाळा ग्लॅमर स्कुल करणार असा ठाम विश्वास राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई- मुंबई महापालिका शाळांचा चेहरा मोहरा बदलत असून विद्यार्थ्यांना 360 डिग्री सर्वांगिण शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळत असून एसएससी, सीबी एससी, आयसीएसई बोर्डाचे शिक्षण सुरू केले आहे. आगामी काळात केम्ब्रिज विद्यापीठाशी करार करून पालिका विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. इंग्लंडप्रमाणे महापालिका शाळा ग्रामर स्कूल करणार असा ठाम विश्वास राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 41येथील बृहन्मुंबई महानगर पालिका शाळा क्र. १ ही शाळा बैठ्या छप्पर असलेल्या इमारतीमध्ये भरत होती. 1986 साली येथे बैठी शाळा बांधण्यात आली होती.मात्र 2014 साली सदर शाळेची इमारत धोकादायक झाल्याने  येथे 5 मजली सुसज्ज शाळेची इमारत नव्याने बांधण्यात आली. येथे सुमारे 1600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी या शाळेच्या नूतनीकरणासाठी बजेट प्रोव्हिजन पासून ते डिझाईनपर्यंत सातत्याने प्रयत्न केले होते. तर माजी नगरसेवक सदाशिव पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता,तर विद्यमान नगरसेवक तुळशीराम शिंदे यांनी शाळेच्या नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास नेले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे महापालिकेची सीबीएससी शाळा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर, स्थानिक आमदार सुनील प्रभू, मुंबईचे उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, महिला विभाग संघटक व नगरसेविका साधना माने, शिक्षण समिती अध्यक्ष संध्या विपुल दोशी, पी उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष संगीता सुतार, प्रभाग क्रमांक 41 चे स्थानिक नगरसेवक तुळशीराम शिंदे, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष प्रतिमा खोपडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केजी ते पीजीपर्यंत सर्वांना शिक्षण मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. 2013 साली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका शाळा हायटेक करून येथील विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी त्यांनी 90 शाळांमध्ये व्हर्च्युअल शिक्षण सुरू केले. तर 2017 साली 90 माध्यमिक शाळांमध्ये व्हर्च्युअल सुरू केले.2016 -2017 साली पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना टॅब दिले. नव्याने बांधण्यात येणाऱ्या पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुसज्ज प्रयोगशाळा,मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण,कँटीन,चांगले शौचालय आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या.

आमदार भाई जगताप म्हणाले की,महाविकास आघाडीने नवे शिक्षण पर्व सुरू केले आहे. याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाते. पालिकेचा शिक्षणाचा दर्जा उंचवला असून दिंडोशी येथील या पब्लिक शाळेप्रमाणे  पालिकेच्या 24 शाळा या पब्लिक झाल्या आहेत याचा अभिमान आहे.येथे एक नवे शिक्षण दालन सुरू केल्याबद्धल त्यांनी आभार मानले.

डायलीसीस केंद्राचे लोकार्पणदिंडोशी येथील शाळेच्या इमारतीच्या नुतनीकरण उद्धाटनापूर्वी दिंडोशी, त्रिवेणी नगर येथील डायलीसीस केंद्राचे लोकार्पण उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. चार ते पाच लाख लोकसंख्या असलेल्या मालाड पूर्व भागात माफक दरात डायलिसिस सेवा नव्हती आणि ती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिवसेनेने दिलेले होते.

टॅग्स :आदित्य ठाकरेशाळामुंबईशिवसेना