आदित्य मिश्राची अनपेक्षित बाजी
By Admin | Updated: February 5, 2015 00:55 IST2015-02-05T00:55:47+5:302015-02-05T00:55:47+5:30
बोरीवली येथील गोखले शिक्षण संस्थेच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत निरंजन मजिठिया कॉलेजच्या आदित्य मिश्राने अनपेक्षितपणे बाजी मारली.

आदित्य मिश्राची अनपेक्षित बाजी
मुंबई : बोरीवली येथील गोखले शिक्षण संस्थेच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत निरंजन मजिठिया कॉलेजच्या आदित्य मिश्राने अनपेक्षितपणे बाजी मारली. ‘टच अॅण्ड मूव्ह’ नियमाचा फटका बसल्याने निर्मल डिग्री कॉलेजच्या रियाझ अन्सारीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी अथर्व कॉलेजने बॉक्स क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद उंचावले.
एकूण १२ फेऱ्यांमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत रियाझने पहिल्या सामन्यापासून एकतर्फी विजयांचा धडाका लावत अंतिम फेरी गाठली. संपूर्ण स्पर्धेतील कामगिरीनुसार त्याला संभाव्य विजेता मानले जात होते. मात्र नेमके अंतिम सामन्यात मोक्याच्या वेळी केलेली चूक रियाझला महागात पडली.
सफेद मोहऱ्यांनी खेळताना रियाझने सिसिलियन पद्धतीने डावाला सुरुवात केली. आदित्यने क्वीन (वझीर) आणि बिशपच्या (उंट) आक्रमणाने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. १०व्या चालीमध्ये आदित्यच्या क्वीनला माघारी पाठवत रियाझने सामन्यावर नियंत्रण मिळवले. यावेळी आदित्यकडून चुका झाल्याने त्याने आपला रुक (हत्ती) गमावला.
सामन्यातील २५व्या चालीमध्ये खरे नाट्य घडले. पूर्णपणे वर्चस्व मिळवलेल्या रियाझने क्वीनच्या साहाय्याने नाइटचा (घोडा) बळी घेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात क्वीनला बिशपचे संरक्षण असल्याचे लक्षात आल्याने त्याने ती चाल खेळली नाही. मात्र नाइटला स्पर्श केल्याने आदित्यने ‘टच अॅण्ड मूव्ह’च्या आधारे रियाझवर आक्षेप घेत त्याला ती चाल खेळण्यास भाग पाडले. हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला आणि नाइटच्या बदल्यात रियाझची क्वीन मिळवत आदित्यने पुनरागमन केले. यानंतर पूर्णपणे नियंत्रण गमावलेल्या रियाझकडून माफक चुका झाल्या आणि ३३ व्या चालीमध्ये क्वीनच्या जोरावर आदित्यने अनपेक्षितरीत्या बाजी मारली.
दुसऱ्या बाजूला मोठ्या जल्लोषात पार पडलेल्या बॉक्स क्रिकेटमध्ये गतउपविजेत्या असलेल्या अथर्व कॉलेजने गेल्या वर्षीची सगळी कसर भरून काढताना अंतिम सामन्यात डहाणूकर कॉलेजचा ३ धावांनी पराभव करीत विजेतेपदावर नाव कोरले. (प्रतिनिधी)