सिडकोला हवाय अतिरिक्त जिल्हाधिकारी

By Admin | Updated: June 2, 2014 04:10 IST2014-06-02T04:10:52+5:302014-06-02T04:10:52+5:30

आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या उभारणीला गती देण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याची नेमणूक करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे

Additional Collector of Wadia CIDCO | सिडकोला हवाय अतिरिक्त जिल्हाधिकारी

सिडकोला हवाय अतिरिक्त जिल्हाधिकारी

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या उभारणीला गती देण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याची नेमणूक करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. तशा आशयाच्या ठरावाला संचालक मंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. सदर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. सिडकोचे अध्यक्ष संजय भाटीया आणि सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा यांच्या सर्वंकष प्रयत्नांमुळे विमानतळ उभारण्याच्या मार्गातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. या प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या दहा गावांतील ग्रामस्थांनी जमीन अधिग्रहणास मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या काळात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामाला गती देण्याचा मानस सिडकोने व्यक्त केला आहे. विमानतळबाधित गावांच्या पुनर्वसनासाठी दापोली येथे पुष्पकनगर साकारले जाणार आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांना याच पुष्पकनगरमध्ये २२.५ टक्के विकसित भूखंड देण्यात येणार आहेत. या जागेच्या विकासकामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. असे असले तरी ही संपूर्ण प्रक्रिया गतिमान व तितक्याच पारदर्शकपणे पार पडावी, असे सिडकोचे प्रयत्न आहेत. त्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याची नेमणूक करण्याचे सिडकोने ठरविले आहे. हा अधिकारी सिडकोच्या कामाचे निरीक्षण व मार्गदर्शन करणार आहे. तसेच विमानतळासाठी जमीन संपादित करणे आणि प्रकल्पग्रस्तांना द्यावयाच्या मोबदल्याच्या कामाला गती देण्याचे काम करणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या ठरावाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच अंतिम मंजुरीसाठी सदर प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Additional Collector of Wadia CIDCO