Join us

गोविंदांच्या दहीहंडीला सेलिब्रिटींचा तडका; कोणते स्टार कुठे उपस्थित राहणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 09:53 IST

कलाकारांनी उपस्थित राहून गोविंदांचे मनोरंजन करावे, यासाठी काही मंडळे आजही लाखो रुपये खर्च करतात.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बाळगोपाळ गोविंदा 'बोल बजरंग बली की जय... 'चा नारा देत थरावर थर रचत दहीहंडीचा उत्सव साजरा करत असतानाच कोरोनानंतर सेलिब्रिटींच्या उपस्थितीचा तडका देण्याचा ट्रेंड पुन्हा जोर धरू लागला आहे. त्यामुळे आता या उत्सवाला एका इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनापूर्वी दहीहंडी उत्सवातील सेलिब्रिटींचा सहभाग खूप वाढला होता. पण त्यानंतर काही मंडळांनी सेलिब्रिटींवर खर्च होणारा निधी इतर उपक्रमांकडे वळवल्याने सध्या मोजक्याच दहीहंडींमध्ये सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळते आहे.

कलाकारांनी उपस्थित राहून गोविंदांचे मनोरंजन करावे, यासाठी काही मंडळे आजही लाखो रुपये खर्च करतात. यामुळे कलाकारांचा भावही चांगलाच वधारतो. काही आघाडीचे हिंदी कलाकार काही मिनिटे उपस्थित राहण्यासाठी २० लाख रुपयांपेक्षा अधिक मागणी करतात. मराठीतील आघाडीच्या काही अभिनेत्यांची सात लाख रुपये, तर काही अभिनेत्रींची डिमांड पाच लाख रुपये असते. मराठी हिंदी मालिकांमधील कलाकारांनाही एक लाख रुपयांपेक्षा जास्त मानधनाची अपेक्षा असते. कलाकारांनी सांगितलेल्या मानधनाच्या रकमेवर चर्चा करून दोघांचा सुवर्णमध्य काढून बिदागीची रक्कम निश्चित केली जाते. एखाद्या कलाकाराला आपल्याकडे आणण्यासाठी मंडळांमध्येही चढाओढ सुरू असते. कित्येकदा प्रतिस्पर्धी मंडळाचा कलाकार आपल्याकडे आणण्यासाठी जास्त रकमेची ऑफर केली जाते. त्यामुळेच काही मंडळे श्रीकृष्ण जन्माष्टमीपर्यंत कलाकारांची नावे उघड करत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ऐतिहासिक देखाव्याचे आकर्षण.... दादरमधील आयडियल बुक डेपोच्या दहीहंडीला मिस्टर एशिया रोहन कदम, मिस्टर इंडिया सुहास खामकर आणि अभिनेता भूषण घाडी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. महिला अत्याचाराविरोधातील आणि शिवकालीन मावळ्यांचा ऐतिहासिक देखावा दहीहंडीच्या थरावर सादर केले जाईल. दिव्यांग दृष्टीहीन गोविंदाही येथे हंडी फोडतील. 'सुपरस्टार सिंगर आवाज उद्याचा' शोमधील कलाकार गाणी सादर करतील, 'मुलगी पसंत आहे' आणि 'दुर्गा' मालिकेतील कलाकार हजर राहतील. सेलिब्रिटी दहीहंडीचेही आयोजन होईल.

विकी कौशल व करिश्मा कपूर या हिंदीतील कलाकारांसोबत मराठमोळी भाग्यश्री पटवर्धन बोरिवली पूर्वेला असलेल्या देवीपाडा मैदानावरील दहीहंडी उत्सवाला हजर राहणार आहेत.

भाऊ कदम कुठे जाणार?

कुर्ला नेहरूनगरमधील आमदार मंगेश कुडाळकर यांच्या दहिहंडीला भाऊ कदम, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'तील अरुण कदम, प्रभाकर मोरे, पृथ्वीक प्रताप, वनीता खरात, प्रसाद खांडेकर, तसेच मेघा घाडगे, गौरी जाधव, हेमलता बाणे हे कलाकार असतील.

प्रवीण तरडेसह 'धर्मवीर २'ची टीम पुण्यात जाणार आहे. • संस्कृती बालगुडे खोपोलीमध्ये, तर स्पृहा जोशी आणि शिवानी सुर्वे पुण्यामधील गोविंदांचा उत्साह वाढवणार आहेत.

सई ताम्हणकर मुंबई आणि नवी मुंबईतील मंडळांना भेट देणार आहे.

प्रसाद ओक, मंगेश देसाई आणि क्षितीज दाते यांची टीम  ठाण्यात टेंभीनाक्यावरील आनंद दिघे यांच्या दहीहंडीसोबत रवींद्र फाटक यांची संकल्प प्रतिष्ठान, प्रभादेवीला सदा सरवणकर, बोरीवलीला प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीला उपस्थित राहणार आहेत.

प्राजक्ता माळी ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठान, संस्कृती प्रतिष्ठान आणि आनंद दिघे यांच्या टेंभीनाक्यावरील दहीहंडीच्या उत्सवात हजेरी लावेल.

टॅग्स :दहीहंडी