Actor Saif Ali Khan Attacked: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात जीवघेण्या हल्ल्याची घटना समोर आली आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सैफच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफच्या अंगावर बरेच वार झाले. या हल्ल्यानंतर त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. सैफच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न झाल्याची माहिती त्याच्या अधिकृत टीमकडून जाहीर करण्यात आली आहे.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. रात्री २ वाजता चोरट्याने घरात घुसून सैफ अली खानवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या शरीरावर चार ते पाच वेळा हल्ले झाले. सैफ अली खानला सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहे. हल्ला कोणी आणि का केला याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.
काय म्हणाले मुंबई पोलीस?
"काल रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीने अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्या मोलकरणीशी वाद घातला. अभिनेताने मध्यस्थी करून त्या माणसाला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत," अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
रुग्णालयाने काय माहिती दिली?
लीलावती रुग्णालयाचे संचालक नीरज उत्तमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री ३.०० ते पहाटे ३:३० या दरम्यान अभिनेत्याला सहा जखमांसह दाखल करण्यात आले होते. दोन खोल जखमा आहेत. यातील एक जखम त्याच्या मणक्याच्या अगदी जवळ आहे. ति किती धोकादायक आहे, याची माहिती घेतली जात आहे. आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत. त्याची शस्त्रक्रिया न्यूरो सर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ज्ञ निशा गांधी करत आहेत. शस्त्रक्रियेनंतरच त्याला किती नुकसान झाले आहे हे सांगता येणार आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, सैफने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये बाचाबाची झाली मात्र हल्लेखोर फरार झाला. मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या घरी हा हल्ला झाला. चोरट्याने त्याच्या घरात प्रवेश केल्यावर काही लोक झोपेतून जागे झाले आणि त्यांनी आवाज केला. इतक्यात सैफ अली खानही जागा होऊन बाहेर आला. यानंतर खान आणि चोरामध्ये बाचाबाची झाली. यानंतर त्याने चाकूने हल्ला केला. यावेळी त्याची दोन लहान मुले देखील होती. घरातील काही सदस्यांनी त्याला दवाखान्यात नेले.