Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता डिनो मोरियासह भावाची आठ तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 06:44 IST

पुढेही गरज पडल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मुंबई : मिठी नदी गाळ उपसा भ्रष्टाचार प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया व त्याचा भाऊ सॅन्टिनो  यांची सोमवारी मुंबई पोलिसांनी आठ तास चौकशी केली. डिनो मोरिया हा उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय समजला जातो.

गेल्या दोन दशकांपासून मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या काळात एकूण १८ कंत्राटदारांना कंत्राट दिल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. या भ्रष्टाचारप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थी व दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. यामध्ये पालिकेची ६५ कोटी ५४ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

गैरव्यवहारात सहभाग? 

अटक आरोपी केतन कदम आणि मोरिया बंधूंमध्ये अनेक फोन कॉल्स झाल्याचे दिसून आले. हे कॉल कशासाठी होते? याचा तपास सुरू आहे. तसेच या गैरव्यवहारातील रक्कम ज्या कंपन्यांपर्यंत पोहोचली त्याचे धागेदोरे मोरियापर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. त्याच्या तपासासाठी डिनो व  सॅन्टिनो यांना सोमवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार दोघेही सकाळी ११च्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेत दाखल झाले. 

आठ तासांच्या चौकशीनंतर दोघेही सायंकाळी ७च्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडले. पुढेही गरज पडल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

टॅग्स :डिनो मोरियाआदित्य ठाकरे