Join us  

मराठी चित्रपटाला निदान महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का? - भाऊ कदम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 9:53 AM

डोंबिवलीत 'नशीबवान' ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळालेला नाही. त्यामुळे भाऊ कदम यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

ठळक मुद्देडोंबिवलीत 'नशीबवान' ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळालेला नाही.भाऊ कदम यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. परभाषिक चित्रपट हिट होऊन जातो आणि रातोरात मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच चित्रपटगृहातून पायउतार व्हावं लागतं असं भाऊ कदम यांनी म्हटलं आहे.

मुंबई - मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातील चित्रपटगृहात शो न मिळाल्यामुळे अनेक कलाकार सातत्याने या गळचेपीविरोधात आवाज उठवत असतात. प्रसिद्ध अभिनेता भाऊ कदम यांच्या 'नशीबवान' चित्रपटाला देखील असाच एक अनुभव आला आहे. भाऊ कदम यांची मुख्य भूमिका असलेला  'नशीबवान' हा मराठी चित्रपट शुक्रवारी म्हणजेच 11 जानेवारी 2019 रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. मात्र डोंबिवलीत 'नशीबवान' ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळालेला नाही. त्यामुळे भाऊ कदम यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

'एखादा परभाषीय चित्रपट ‘हिट’ होऊन जातो आणि रातोरात आपल्या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच चित्रपटगृहातून पायउतार व्हावं लागतं' असं भाऊ कदम यांनी म्हटलं आहे. तसेच मध्यमवर्गीयांसाठी तयार केलेल्या चित्रपटाला सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत चित्रपटगृहात काही मोजकेच शो दिले जातात आणि मराठी चित्रपट पाहण्यासाठी तुमचेच मराठी प्रेक्षक येत नाहीत असं म्हटलं जात असल्याची तक्रार भाऊ कदम यांनी केली आहे. ज्या डोंबिवलीचा वारंवार उल्लेख आपण अभिमानाने करतो, तिथेसुद्धा 'नशीबवान' ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळाला नाही, अशी व्यथा अभिनेता भाऊ कदम यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मांडली आहे. मराठी चित्रपटाला निदान महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का? असा प्रश्न भाऊनी आपल्या फेसबुक पोस्टमधून विचारला आहे.

'नशीबवान' या चित्रपटात भाऊ कदम बी. एम. सी. च्या सफाई कामगारांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी भाऊ कदम यांनी काही खास तयारी केली होती. जेणेकरून ते निभावत असलेली भूमिका कुठेही कमजोर पडू नये, खोटी वाटू नये यासाठी विशेष मेहनत घेतली होती. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती असलेला, फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले असून, अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील यांनी निर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे सहनिर्माते असणार आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना  मिताली जगताप–वराडकर, नेहा जोशी, राजेश शृंगारपुरे, अतुल आगलावे या कलाकाराचा देखील दमदार अभिनय पाहायला मिळाला आहे. 'नशीबवान' हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे. 

टॅग्स :नशीबवानफेसबुकनाटकडोंबिवली