प्रदूषणकारी कारखान्यांवर होणार कारवाई!

By Admin | Updated: February 3, 2015 23:06 IST2015-02-03T23:06:08+5:302015-02-03T23:06:08+5:30

राज्याचे उद्योग व पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी मंगळवारी सकाळी एमआयडीसीमधील विविध ठिकाणांची पाहणी केली.

Action will be taken to polluting factories! | प्रदूषणकारी कारखान्यांवर होणार कारवाई!

प्रदूषणकारी कारखान्यांवर होणार कारवाई!

पनवेल : तळोजा औद्योगिक परिसरातील प्रदूषणासंबंधीच्या रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेवून राज्याचे उद्योग व पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी मंगळवारी सकाळी एमआयडीसीमधील विविध ठिकाणांची पाहणी केली. येथील प्रदूषण पसरविणाऱ्या कारखान्यांची कागदपत्रे तपासून व प्रदूषणाचा अहवाल मागवून संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री पोटे यांनी यावेळी दिले.
तळोजा एमआयडीसी परिसरात ९०० हेक्टरच्या जागेत ९५० पेक्षा जास्त लहान, मोठ्या कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांतील रसायनयुक्त पाण्यावर सीइटीपीमार्फत प्रक्रिया करुन त्यानंतर हे पाणी नदीत सोडले जाणे आवश्यक आहे, मात्र प्रत्यक्षात हे पाणी थेट येथील कासाडी नदीत सोडले जाते. या प्रकल्पावर दरमहा लाखो रुपये खर्चूनही नदीत दूषित पाण्याचीच मात्रा जास्त असल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या कारखान्यांवर व या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच पाणी उपसा करणारे किती पंप याठिकाणी आहेत? त्यापैकी किती सुरु आहेत, किती बंद आहेत? त्यांचे येणारे बिल यासंबंधीही महावितरणकडून अहवाल मागविण्यात येणार आहे. पोटे यांनी तळोजा एमआयडीसी परिसरातील खड्डे, सुरु असलेल्या प्रदूषणाबाबत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे यशवंत सोनटक्के, एमआयडीसीमधील अधिकारी आर. पी. पाटील आदींसह भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड आदींसह भाजपाचे कार्यकर्ते या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Action will be taken to polluting factories!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.