ठाणे मनपाच्या नॉट रिचेबल अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
By Admin | Updated: May 28, 2015 22:59 IST2015-05-28T22:59:23+5:302015-05-28T22:59:23+5:30
मान्सूनच्या काळात घडणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग ७१ बोटींसह सज्ज झाला असून इतर विभागांतील अधिकारीही सज्ज राहावेत,

ठाणे मनपाच्या नॉट रिचेबल अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
ठाणे : मान्सूनच्या काळात घडणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग ७१ बोटींसह सज्ज झाला असून इतर विभागांतील अधिकारीही सज्ज राहावेत, यासाठी आता अतिरिक्त आयुक्तांनी सर्व विभागांतील अधिकाऱ्यांसाठी एक फर्मान काढले आहे. यानुसार, मान्सूनच्या दिवसांत ज्या अधिकाऱ्यांचे मोबाइल बंद राहतील, ज्यांच्याकडून कॉल घेतले जाणार नाहीत, तसेच नंबर बदलल्याचे कळविले नाही, तर त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिका क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक दुर्घटनेबाबतची माहिती दुर्घटनेशी संबंधित विभागाशी संलग्न असलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या अनुषंगाने दूरध्वनी व एसएमएसद्वारे माहिती पुरविली जात आहे. त्यानुसार, आपत्तीच्या परिस्थितीत सर्वच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपले मोबाइल २४ तास सुरू ठेवावेत, असे आदेश एका परिपत्रकानुसार देण्यात आले आहेत. सुटीवर जाताना कोणत्या अधिकाऱ्याकडे कार्यभार सुपूर्द केला आहे, याचीही माहिती देण्यात यावी. परंतु, असे न केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
(प्रतिनिधी)
दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागात सध्या ३० अधिकारी, कर्मचारी सज्ज असून पावसाळ्यात आणखी कर्मचारी वाढविण्यात येणार आहेत. तसेच वेळ पडल्यास ठेकेदाराकडील कर्मचारीवर्गाला समाविष्ट करून घेतले जाणार आहे. याशिवाय, खाजगी मालकीच्या ५७ आणि महापालिकेच्या १४ अशा मिळून एकूण ७१ लहानमोठ्या बोटी सज्ज ठेवल्या आहेत. यामध्ये साधी बोट, पॅडल बोट, मशीन बोट आदींचा यात समावेश असून आपत्ती उद्भवल्यास यातून २ ते ४० व्यक्तींचा एकाच वेळी बचाव करता येऊ शकणार आहे. परंतु, पालिकेकडे असलेल्या बोटी या साध्या स्वरूपाच्या आहेत. या बोटी मासुंदा तलाव येथे ३८, हरियाली तलाव ७, जेल तलाव १, रेवाळे १, कोलबाड १, आंबेघोसाळे ९, कौसा आणि खिडकाळी येथे प्रत्येकी १ आणि दिवा, दातिवली येथे ७ बोटी सज्ज ठेवल्या आहेत.
मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग आठवड्याचे सातही दिवस २४ तास कार्यरत झाला आहे. एखादी आपत्ती घडल्यास १८००-२२२-१०८ हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला असून २५३७१०१०, २३७४५७८, २५३७४५७९, २५३७४५८०-८१ -८२, २५३९९८२८, २५३९२३२३, २५३९९६१७ आदी क्रमांक कार्यरत ठेवण्यात आले आहेत.