Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसजावटीत प्लास्टिक फुले वापरल्यास डेकोरेटर, हॉलवर होणार कारवाई; मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 09:45 IST

या निर्णयामध्ये केवळ प्लास्टिक फुलांचे उत्पादन व विक्रीच नव्हे, तर सजावटीसाठी त्यांचा वापर करणारे डेकोरेटर देखील शिक्षेस पात्र असतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

मुंबई : नैसर्गिकरीत्या विघटन न होणाऱ्या प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर राज्यात पूर्वीपासूनच बंदी आहे. ही बंदी अधिक स्पष्ट, परिणामकारक आणि कठोर करण्यासाठी लवकरच स्वतंत्र शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल. तसेच, या निर्णयामध्ये केवळ प्लास्टिक फुलांचे उत्पादन व विक्रीच नव्हे, तर सजावटीसाठी त्यांचा वापर करणारे डेकोरेटर देखील शिक्षेस पात्र असतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

मोठे हॉल जे अशा डेकोरेशनला परवानगी देतील, त्यांच्यावरही कारवाईची तरतूद या जीआरमध्ये असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

दादरमधील फूलविक्रेत्यांना योग्य जागा

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आ. जयंत पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेने दादर फुल मार्केटमधील फुल विक्रेत्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली तिथून हटवले आहे. त्यामुळे मुंबई फुल विक्रेता असोशिएशने बंद पुकारला असून सध्या फुलविक्री पूर्णपणे बंद असल्याचे सांगत हा बंद मागे घेण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची मागणी केली. 

त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिक्रमण कारवाईमुळे फूल विक्रेत्यांवर कारवाई झाली असेल, तर त्यांनाही योग्य ती जागा देऊ. महापालिकेला तातडीने आदेश देण्यात येतील असे सांगितले.

गत पाच वर्षांत काय झाले?

९२,००० ठिकाणी बंदीचे उल्लंघन

४१३५ टन प्लास्टिक जप्त

२५ कोटी रुपये दंड वसूल

मंत्री पंकजा मुंडे यांनी पर्यावरण विभागाकडून झालेल्या कारवाईची माहिती दिली. प्रथम उल्लंघन केल्यास ५ हजार, दुसऱ्यांदा १० हजार दंड, तर तिसऱ्यांदा ३ महिन्यांचा कारावास व २५ हजार दंड अशी कठोर शिक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Action against plastic flower use in wedding decorations: Maharashtra Govt.

Web Summary : Maharashtra bans plastic flowers in wedding decor; decorators and halls penalized. Violators face fines, jail. Authorities will provide space for flower vendors removed in Dadar.
टॅग्स :विधान भवनविधानसभादेवेंद्र फडणवीसफुलं