त्या भोंदूवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई!
By Admin | Updated: May 9, 2015 23:07 IST2015-05-09T23:07:21+5:302015-05-09T23:07:21+5:30
शारीरिक संबंध ठेवल्यास घरात पैशांचा पाऊस पडेल, असे सांगून युवतींचे शारीरिक शोषण करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भोंदूला ठाण्याच्या पोलीस

त्या भोंदूवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई!
डोंबिवली : शारीरिक संबंध ठेवल्यास घरात पैशांचा पाऊस पडेल, असे सांगून युवतींचे शारीरिक शोषण करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भोंदूला ठाण्याच्या पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांसह येथील मानपाडा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक झालेल्या विजय ठोमरे (४८), याच्यासह त्यास मदत करणाऱ्या दलाल जानकी नवनाथ शिंदे (४०) या दोघांना कल्याण कोर्टात हजर केले असता त्यांना १२ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
ही माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम रणदिवे यांनी दिली. ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन विभागाचीही या कारवाईत महत्त्वाची भूमिका होती. अटक झालेला आरोपी हा उच्चभ्रू सोसायटीत राहणारा असून विविध लोभांचे आमिष दाखवून तो अत्याचार करत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
आरोपीला ताब्यात घेऊन चौकशीनंतर अटक केली. अवघ्या काही वेळातच जानकीलाही ताब्यात घेतल्यावर चौकशीअंती तीदेखील त्यास साथ देत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, त्या दोघांना अंधश्रद्धा निर्मूलन कायदा (३) याअंतर्गत अटक करण्यात आली. त्या दोघांनाही कोर्टात दाखल केल्याचे ते म्हणाले.
अद्याप एकाच अल्पवयीन मुलीबाबत त्याने असे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आणखी माहिती मिळाली नाही. पैशांच्या व अन्य लोभापायी तिच्या आईनेही मुलीला आरोपीकडे सोपविल्याने तिचीही चौकशी होणार असून तिलाही अटक होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार, तिची माहिती घेणे सुरू आहे.