अनधिकृत रिक्षांवर आज कारवाई ?
By Admin | Updated: May 19, 2015 23:38 IST2015-05-19T23:38:03+5:302015-05-19T23:38:03+5:30
बोईसर व तारापूर एम.आय.डी.सीमध्ये चालणाऱ्या अनधिकृत रिक्षा, बस व जीपवर जोपर्यंत ठोस कारवाई होणार नाही,

अनधिकृत रिक्षांवर आज कारवाई ?
बोईसर : बोईसर व तारापूर एम.आय.डी.सीमध्ये चालणाऱ्या अनधिकृत रिक्षा, बस व जीपवर जोपर्यंत ठोस कारवाई होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार शिवसेना प्रणित रिक्षाचालक मालक संघटनेने केला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. यासंदर्भात बुधवारी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी बैठक बोलावली असून यात तोडगा निघण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ, पंचायत समितीचे सभापती रवींद्र पागधरे, पंचायत समिती सदस्य सुशिल चुरी व मेघन पाटील, बोईसर शिवसेना शहर प्रमुख व उपसरपंच निलम संखे व रिक्षा युनियनचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बोईसर रिक्षा स्टँडवर आंदोलक रिक्षाचालकांबरोबर दुपारी सभा घेण्यात आली. यावेळी प्रभाकर राऊळ यांनी अनधिकृत रिक्षा व वाहणे बंद करण्यासंदर्भात सेना प्रणित युनियनच्या माध्यमातुन सातत्याने प्रयत्न केले. मात्र कारवाई होत नसल्याने आंदोलन सुरु करावे लागले. जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)
प्रवाशांना त्रास
रिक्षाबंद आंदोलनाचा त्रास प्रवाशांना झाला. भर उन्हात प्रवासी पायपीट करीत होते. दरम्यान गणेश नाईक यांच्या शिवशक्ती प्रणित ठाणे जिल्हा आॅटो रिक्षाचालक-मालक संघटनेच्या रिक्षा चालकांनी बंदमध्ये सहभाग न घेतल्याने प्रवाशांना काहीसा आधार मिळाला तर, शिवशक्ती प्रणीत रिक्षा युनियनने दिडशे रिक्षा सुरू होत्या असा दावा केला आहे.
जानेवारी २०१५ पासून आजपर्यंत सुमारे दिड हजार रिक्षांवर कारवाई केली. त्यामध्ये रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या रिक्षाचा समावेश आहे. वेळोवेळी कारवाई केली जात असून मध्यंतरी आरटीओ बरोबरही संयुक्त मोहिम राबविली. वाहतूक नियमनासाठी अवघे पाच पोलीस आहेत. त्यांचा बहुतांश वेळ ट्रॅफीक जॅम काढण्यात जातो. रिक्षा स्टँड बाहेरील रस्त्यावर प्रवाशांना उरतवू किंवा भरू नयेत, याला मज्जाव केल्याने रिक्षा चालकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
- महेश पाटील,
सहाय्यक पोलीस निरिक्षक
अनधिकृत रिक्षा बंद करण्यासाठी आम्ही सात्यत्याने पत्रव्यवहार केला, अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. आमचा पाठपुरावाही सुरू आहे. परंतु प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही. यातून मार्ग काढणे गरजेचे आहे.
- संजय पाटील, संघटक, शिवशक्ती प्रणीत आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना