बोईसरमध्ये दोन गटांत हाणामारी
By Admin | Updated: April 26, 2015 23:05 IST2015-04-26T23:05:10+5:302015-04-26T23:05:10+5:30
येथील एका स्टील कंपनीचे भंगार उचलण्याच्या टेंडरवरून उद्भवलेल्या वादाचे पर्यावसान दोन गटांत हाणामारीत होऊन चार जण जखमी झाले.

बोईसरमध्ये दोन गटांत हाणामारी
बोईसर : येथील एका स्टील कंपनीचे भंगार उचलण्याच्या टेंडरवरून उद्भवलेल्या वादाचे पर्यावसान दोन गटांत हाणामारीत होऊन चार जण जखमी झाले. यात भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य तर, शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्याचा सहभाग आहे. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी पाच जणांना शुक्रवारी रात्री अटक करून जामिनावर सोडले.
बोईसर पूर्व भागातील वारांगडे येथील विराज प्रोफाईल या स्टील कंपनीतील लोखंडी चुऱ्याचे (स्क्रॅप) भंगार उलचण्याचे टेंडर शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य मुकेश पाटील यांना मिळाले. त्यांनी स्क्रॅप उचलण्याचे काम सुरू केले. मात्र जिल्हा परिषद सदस्य व वाळपा जिल्हा कृषी विभागाचे सभापती अशोक वडे यांच्या माणसांनीही टेंडर भरले होते. परंतु त्यांना ते मिळाले नाही. त्यानंतर कंपनीच्या डंपींग यार्डजवळ दोन्ही गटामध्ये हाणामारी झाली. परस्परांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. रात्री उशिरा सहा जणांना अटक करून जामिनावर सोडले. दोन्ही गटाचे पाठीराखे बोईसर पोलीस स्थानकाबाहेर जमल्याने काही काळाकरिता तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी पोलिसांनी वाद घालणाऱ्यांना चोप दिला. (वार्ताहर)