ट्रिपल सीट गोविंदांवर कारवाई

By Admin | Updated: September 6, 2015 03:08 IST2015-09-06T03:08:45+5:302015-09-06T03:08:45+5:30

उच्च न्यायालयाने निर्बंध घातल्यानंतर आधीच चिंतेत असलेल्या गोविंदांवर वाहतूक पोलिसांनीही कारवाईचा बडगा उगारण्याचे नियोजन केले आहे. हंड्या फोडण्यासाठी निघणारे

Action on Triple Seat Govind | ट्रिपल सीट गोविंदांवर कारवाई

ट्रिपल सीट गोविंदांवर कारवाई

मुंबई : उच्च न्यायालयाने निर्बंध घातल्यानंतर आधीच चिंतेत असलेल्या गोविंदांवर वाहतूक पोलिसांनीही कारवाईचा बडगा उगारण्याचे नियोजन केले आहे. हंड्या फोडण्यासाठी निघणारे गोविंदा ट्रिपल सीट अथवा मद्यपान करून असल्यास त्यावर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे.
तसेच न्यायालयाच्या नियमांचे पालन होते की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी पोलीस मुंबईतील तब्बल ८०० बड्या गोविंदांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणार आहेत. हा न्यायालयाच्या आदेशाचाच भाग आहे. न्यायालयानेच गेल्या वर्षी हे आदेश दिले होते. त्यामुळे गोविंदा किती थर उभे करत आहेत किंवा त्यांना सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट दिले आहेत की नाहीत, थर उभे राहणार असलेल्या ठिकाणी गाद्या टाकल्या आहेत की नाहीत हे सर्व पोलीस कॅमेऱ्यात टिपणार आहेत.
त्याचबरोबर गर्दीमध्ये महिलांची छेडछाड होणार नाही किंवा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याचीही काळजी पोलीस घेणार आहेत. या व्हिडीओ रेकॉर्डिंगद्वारे अशा घटनांवरही पोलीस नजर ठेवणार आहेत. यासाठी तब्बल ३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत गस्त घालणार आहे.
मुंबईमध्ये यंदा तब्बल ३४७० आयोजकांनी दहीहंडी बांधली आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त पोलिसांची साप्ताहिक सुटीही रद्द करण्यात आली आहे. या हंड्यांपैकी ८०० हंड्या बड्या आयोजकांच्या आहेत, तर ४०४ या राजकीय पुढाऱ्यांच्या हंड्या आहेत. या हंड्यांचे रेकॉर्डिंग केल्यानंतर हा पुरावा म्हणूनही पोलिसांना कारवाई करताना वापरता येणार आहे. पोलीस कारवाईसाठी आल्यानंतर आयोजक पुरावा दाखवा, असे पोलिसांना धमकावतात. चित्रीकरणामुळे पोलिसांना थेट कारवाई करता येणार आहे. त्याचबरोबर दारूच्या नशेत धुडगूस घालणाऱ्या गोविंदांवरही पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यातून महिलांच्या संरक्षणाबरोबर अपघातांसारख्या घटनांवरही आळा घालण्यास मदत होईल. त्यासाठी ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, ट्रिपल सीट तसेच ट्रकवरून जाणाऱ्या गोविंदांच्या मागावर पोलीस असणार असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

शासनाच्या नियमांचे पालन करा...
दहीहंडी उत्सव शांततेत पार पाडून न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे यासाठी सर्व दहीहंडी आयोजकांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. तरीही सर्वांनी याचे पालन करून महिलांच्या सुरक्षेची काळ्जी घ्या, असे आवाहन मुंबई पोलीस प्रवक्ते कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना केले.

Web Title: Action on Triple Seat Govind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.