तीन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई
By Admin | Updated: April 25, 2015 22:36 IST2015-04-25T22:36:05+5:302015-04-25T22:36:05+5:30
मागील दोन वर्षांत डायघर पोलीस ठाण्याच्या तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर इमारत दुघर्टना असो किंवा बारवरील कारवाई असो, या ना त्या कारणाने कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

तीन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई
ठाणे : मागील दोन वर्षांत डायघर पोलीस ठाण्याच्या तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर इमारत दुघर्टना असो किंवा बारवरील कारवाई असो, या ना त्या कारणाने कारवाईला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे एकाच पोलीस ठाण्यातील एकापाठोपाठ आलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने हे पोलीस ठाणे आयुक्तालयात चर्चेचा विषय ठरले आहे. यातील दोघांवर निलंबनाची तर एकावर बदलीची कारवाई करून चौकशीचा फार्स लावला आहे.
शीळ-डायघर येथील उत्सव बारवर ठाणे विशेष शाखेने १५ एप्रिल रोजी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने कारवाई केली होती. त्या वेळी तपासात सापडलेल्या डायरीत तेथील डायघरचे वरिष्ठ निरीक्षक आर.एस. पवार आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) उदय पवार यांच्या नावापुढे पैसे घेतल्याचे समोर आले. ही बाब लक्षात घेऊन त्यांची तडकाफडकी बदली करून त्यांची चौकशी सुरू केली आहे.
एप्रिल २०१३ या वर्षी पोलीस ठाण्याच्या मागेच असलेली शीळफाटा येथील ‘आदर्श बी’ इमारत दुर्घटना देशभरात चांगली गाजली होती. त्या वेळी डायघर पोलीस ठाण्याचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने तत्कालीन डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.पी. नाईक यांना निलंबित केले होते. त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक अशोक जगताप यांची नियुक्ती झाली होती. या नियुक्तीला सहा महिने होत नाही, तोच राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या पथकाने डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बारवर इंडियन रेस्क्यू मिशन या सामाजिक संस्थेच्या माहितीवरून छापा टाकला होता. त्या वेळी स्थानिक पोलीस याप्रकरणी कारवाई करत नसल्याची तक्रार पोलीस महासंचालकांकडे केली होती. या छाप्यानंतर डायघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जगताप यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक ए.पी. बंजाळे आणि हवालदार टी.डी. बोरसे यांना निलंबित केले होते.
त्यानंतर, या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून आर.एस. पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता त्यांच्यावर कारवाई झाल्याने वरिष्ठांवर कारवाई होणारे पोलीस ठाणे म्हणून नवीन ओळख निर्माण झाली आहे.