जेएनपीटीजवळ हॉटेल्ससह टप-यांवर कारवाई

By Admin | Updated: August 13, 2014 00:08 IST2014-08-13T00:08:13+5:302014-08-13T00:08:13+5:30

जेएनपीटीमध्ये साकारू पाहणाऱ्या २७७ हेक्टर जमिनीवरील विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) च्या उद्घाटनासाठी येत्या १६ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत

Action on the Tapies with hotels near JNPT | जेएनपीटीजवळ हॉटेल्ससह टप-यांवर कारवाई

जेएनपीटीजवळ हॉटेल्ससह टप-यांवर कारवाई

चिरनेर : जेएनपीटीमध्ये साकारू पाहणाऱ्या २७७ हेक्टर जमिनीवरील विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) च्या उद्घाटनासाठी येत्या १६ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त परिसरातील सर्व टपऱ्या, ढाबे, छोटी मोठी हॉटेल्स आदींवर जेएनपीटी प्रशासनाने आज पोलीस बंदोबस्तात बुलडोझर फिरविला. एकीकडे प्रकल्पग्रस्तांना प्रचंड रोजगार मिळणार असल्याच्या भूलथापा मारल्या जात असताना दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांनी उदरनिर्वाहासाठी उभारलेल्या हॉटेल्स आणि टपऱ्या उठवून जेएनपीटी प्रशासनाने स्थानिकांवर प्रचंड अन्याय केला असल्याची प्रतिक्रिया सोनारी गावचे सरपंच महेश कडू यांनी व्यक्त केली आहे.
जेएनपीटी प्रकल्पाच्या स्थापनेपासून गेली २५ वर्षे जेएनपीटी प्रकल्पात नोकऱ्या न मिळालेले सोनारी, करळ, जसखार, फुंडे, डोंगरी नवघर आदी गावातील नागरिकांनी परिसरात सुमारे साडेतीनशेपेक्षा जास्त टपऱ्या, हॉटेल, ढाबे टाकून आपला उदरनिर्वाह चालविला आहे. परिसरात येणारे कंटनेर ट्रेलर चालक हे दररोज हजारोंच्या संख्येत येत असल्याने दिवसभराची मजुरी निघू शकेल एवढा व्यवसाय या ढाबे व टपऱ्या आणि हॉटेलमालकांचा होत आहे. स्थानिकांसाठी अशाच व्यवसायासाठी हॉकर्सझोन योजना जेएनपीटीने मध्यंतरी जाहीर केली होती. मात्र ती आजतागायत प्रत्यक्षात उतरू शकलेली नाही.
जेएनपीटीच्या बल्क गेटपासून ते थेट करळ फाट्यापर्यंत पीयुबी, गणेश बेंजोप्लास्ट ते आयओसीपर्यंतच्या रस्त्यावरील सर्वच टपऱ्या हॉटेल, धाबे आदींवर आज बुलडोझर फिरविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात जेएनपीटीचे अधिकारी शिबेन कौल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणाऱ्या उच्च पदस्थ सुरक्षा अधिकाऱ्यांच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसारच आम्हाला या अनधिकृत व्यवसायावंर कारवाई करणे भाग पडल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Action on the Tapies with hotels near JNPT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.