मुंबई : लोकलमधील वाढत्या गर्दीमुळे मालडब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. मात्र, ही मागणी रेल्वे प्रशासनाने फेटाळली असून, विद्यार्थ्यांनी नियमबाह्य मालडब्यातून प्रवास केल्यास कारवाई अटळ असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.गर्दीच्या वेळी दरवाजे अडविले जातात. त्यामुळे लोकलमध्ये प्रवेश करणे विद्यार्थ्यांना कठीण होते. यासाठी विद्यार्थ्यांना माल डब्ब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्याची विनंती अनिष वर्मा या विद्यार्थ्याने परेला टिष्ट्वटरच्या माध्यमातून केली होती.लोकलमधील मालडबे हे केवळ सामान घेऊन जाणाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य प्रवाशांनी या बोगीत प्रवेश केल्यास त्यांच्यावर तिकीट तपासनीस नियमांनुसार कारवाई करतील. विद्यार्थ्यांना मालडब्यातून प्रवास करायचा असल्यास तिकीट खिडकीवरून मालडब्यासाठीचे तिकीट घ्यावे, असे उत्तर पश्चिम रेल्वेने टिष्ट्वटरवरून दिले.याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘रेल्वेच्या नियमांप्रमाणे विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे, तसेच नियमबाह्य प्रवास करणे टाळावे.’
विद्यार्थ्यांनी मालडब्यातून प्रवास केल्यास कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 05:22 IST