Join us  

मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी डास आढळल्यास कारवाई - नगरविकास राज्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:50 AM

मुंबईतील मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी महापालिका, मेट्रो प्रशासन आणि कंत्राटदारांकडून नियमित तपासणी व उपायोजना करण्यात येत आहे.

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी महापालिका, मेट्रो प्रशासन आणि कंत्राटदारांकडून नियमित तपासणी व उपायोजना करण्यात येत आहे. शासकीय अथवा खासगी प्रकल्पाच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळल्यास संबंधितांविरूध्द कारवाई करणार असल्याची माहिती नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिली.मुंबईच्या विविध भागात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्डयांमध्ये पाणी साचून मलेरिया, डेंग्यू पसरविणारे डास आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विधान परिषदेतील काँग्रेस सदस्य अनंत गाडगीळ यांच्या परिवाराला मेट्रोच्या डासांमुळे मलेरिया झाला.या पार्श्वभूमीवर विकास प्रकल्पातील खड्डड्यांत डासांची ऊत्पत्ती होणार नाही यासाठी राज्य सरकारने कोणती पावले उचलली आहेत, असा प्रश्न काँग्रेस सदस्य शरद रणपिसे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केली. तर, प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच आरोग्य समस्यांचे धोके स्पष्ट करण्याची मागणी हेमंत टकले यांनी केली.यावर, प्रकल्प सुरू होण्यापूर्वी संभाव्य आरोग्य समस्यांचा विचार करून आरोग्य तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचे मत टर्म्स आॅफ रेफेरेन्समध्ये समाविष्ट करावे, अशा सूचना केल्या जातील, असे राज्यमंत्री योगेश सागर यांनी सांगितले.मुंबईत डास प्रतिबंधाच्या कामांना सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएने त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. त्यांच्यामार्फत मलेरिया व डेंग्यू आजाराच्या रुग्णांचे दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत डेंग्यू डासांची उत्पत्ती आढळलेल्या सोसायट्या, खासगी बांधकाम व्यावसायिक अशा १५१ जणांना नोटीस जारी करण्यात आल्याचेही सागर यांनी सांगितले.

टॅग्स :मेट्रो