सट्टेबाजांवर कारवाई

By Admin | Updated: January 17, 2015 01:38 IST2015-01-17T01:38:19+5:302015-01-17T01:38:19+5:30

आॅस्ट्रेलियात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर लागलेला सट्टा गुन्हे शाखा पोलिसांनी उधळून लावला

Action on speculators | सट्टेबाजांवर कारवाई

सट्टेबाजांवर कारवाई

नवी मुंबई : आॅस्ट्रेलियात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर लागलेला सट्टा गुन्हे शाखा पोलिसांनी उधळून लावला. घणसोली येथे लागलेल्या या सट्ट्याच्या ठिकाणावरून २ लाख ४० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
गुन्हे शाखा पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली आहे. आॅस्ट्रेलिया येथे अ‍ॅडलाईट विरुध्द सिक्सर या दोन संघांत क्रिकेट सामना सुरू असताना हा सट्टा लागला होता. त्याकरिता सट्टेबाजांना फोनवरून माहिती देऊन मोबाइलवर बुकिंग करण्यात आली. या क्रिकेट सामन्यांच्या जय - पराभवावर हा सट्टा लागला होता. घणसोली सेक्टर १५ येथील कृष्णा रेसिडेन्सी येथील १०१ क्रमांकाच्या घरामध्ये हा सट्टा लागला होता. त्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे यांना मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी
छापा टाकून त्यांनी हा सट्टा उधळून लावला.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामधे तेथून सट्ट्यासाठी वापरलेले मोबाइल फोन, लॅपटॉप असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याशिवाय सट्ट्यासाठी मांडलेली २ लाख ४० हजार रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी रमेश राजपूत (३२), पवनकुमार संघवानी (५१), इम्रान बरमारे (२८), सुनीलकुमार पांडे (३४) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Action on speculators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.