‘नयना’ क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर कारवाई
By Admin | Updated: November 17, 2014 00:42 IST2014-11-17T00:42:39+5:302014-11-17T00:42:39+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात ‘नयना’च्या स्वरक्षणासाठी सिडकोने कंबर कसली आहे.

‘नयना’ क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर कारवाई
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात ‘नयना’च्या स्वरक्षणासाठी सिडकोने कंबर कसली आहे. अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम उघडली असून गेल्या दोन दिवसांत या क्षेत्रातील तीन बहुमजली इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे.
विमानतळ प्रभावित क्षेत्रात मोडणाऱ्या ठाणे, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण आणि उरण या तालुक्यातील २५ किलोमीटर क्षेत्रासाठी शासनाने सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार या असे असले तरी आजमितीस सिडकोची कोणतीही परवानगी न घेता या क्षेत्रात अनेक नवीन बांधकामे सुरू असल्याचे दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर सिडकोने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य नियंत्रक म्हणून काही महिन्यांपूर्वी सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसांपासून या क्षेत्रातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात धडक कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत पनवेल तालुक्यातील आदई गावातील तीन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यात दोन बहुमजली इमारतींचा समावेश आहे. नियमानुसार या बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही बांधकाम सुरूच ठेवल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख अनिल पाटील यांनी सांगितले. सिडकोच्या या मोहिमेमुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)