अवैध जाहिरात फलकांवर कारवाई
By Admin | Updated: December 17, 2014 23:04 IST2014-12-17T23:04:03+5:302014-12-17T23:04:03+5:30
नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात कोणतेही फलक, बॅनर्स, स्वागत कमानी लावल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात येईल,

अवैध जाहिरात फलकांवर कारवाई
रोहा : नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात कोणतेही फलक, बॅनर्स, स्वागत कमानी लावल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात येईल, असा इशारा नगरपरिषदेच्यावतीने देण्यात आला. या अवैध जाहिरात फलकांवर आता नगरपरिषदेने बारकाईने लक्ष दिले आहे. नगरपरिषदेने याबाबत एकूण ४२ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना लेखी नोटिसीद्वारे कळविले आहे.
नगरपरिषद हद्दीमध्ये नमूद केलेले फलक, बॅनर्स, पोस्टर्स, जाहिरात लावण्याच्या परवानगीसंदर्भात रोहा नगरपरिषदेने कार्यपध्दती ठरवली आहे, तसेच नगर परिषदेने दिलेल्या परवानगीचा कालावधी या फलकावर लिहिण्याची अट ठेवण्यात आली आहे. देण्यात आलेल्या मुदतीनंतर हे फलक, बॅनर्स, पोस्टर्स तत्काळ काढण्याची कारवाई केली जाईल. जनहित याचिकेबाबत उच्च न्यायालयाने महाराष्ट्र प्रिव्हेंशन आॅफ प्रॉपर्टी अॅक्टमधील तरतुदीनुसार ६ आॅगस्ट रोजीच्या आदेशानुसार अवैध जाहिराती, फलक, होर्डिंग्जसंदर्भात डिफेसमेंट कायद्यातील तरतुदीचा भंग झाल्याचे आढळल्याने कायदेशीर कारवाईबाबत आदेश आल्याची माहिती मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी दिली. (वार्ताहर)