Join us
Daily Top 2Weekly Top 5

पटपडताळणी मोहिमेतील दोषी शाळांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 01:34 IST

राज्यात ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या काळात झालेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेत कमी उपस्थिती असलेल्या व त्रुटी आढळलेल्या राज्यातील शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश प्राथमिक संचालनालयाकडून देण्यात आले आहेत.

मुंबई : राज्यात ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या काळात झालेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेत कमी उपस्थिती असलेल्या व त्रुटी आढळलेल्या राज्यातील शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश प्राथमिक संचालनालयाकडून देण्यात आले आहेत. यासंदर्भातील परिपत्रक मुंबईतील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि पश्चिम, उत्तर, दक्षिण विभागाचे शिक्षण निरीक्षक यांना पाठविण्यात आले आहे.बोगस विद्यार्थी पटावर दाखवून शासनाची दिशाभूल करणे, वाढीव तुकडी मागणे, वाढीव तुकड्या दाखवून अतिरिक्त शिक्षकांची पदे मंजूर करून घेणे तसेच शासनाच्या विविध योजनांवरील शालेय पोषण आहार, गणवेश, लेखन साहित्य, स्वाध्याय पुस्तिका, टर्म फी, शिष्यवृत्ती असे आणि इतर लाभ मिळविले, असे गैरप्रकार करणाऱ्या शाळा, संस्थाचालक यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे निर्देश शिक्षणाधिकाºयांना प्राथमिक संचालनालयाकडून देण्यात आले आहेत.शाळांनी सर्व नियमांना तिलांजली देऊन बनावट कागदपत्रे तयार करून अनुदानाच्या माध्यमातून सरकारचे कोट्यवधी रुपये हडप केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अधिकारी आणि पालकांवरही फौजदारी कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याआधीही दिले होते. त्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्व शाळांवर कारवाई करण्याची ग्वाही शिक्षण विभागाने दिली होती. मात्र, अद्याप एकाही शाळेवर कारवाई झालेली नाही.या एकंदर प्रकरणात शाळांचे संस्थाचालक दोषी असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशा सूचना पत्रकात नमूद करण्यात आल्या आहेत. ही कारवाई आणि त्याचा अहवाल संचालनालयाला प्राप्त न झाल्यास यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना जबादार धरण्यात येईल, असा इशाराही शिक्षण संचालकांकडून देण्यात आला आहे.

टॅग्स :शाळा