रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमणावर कारवाई
By Admin | Updated: September 25, 2014 00:55 IST2014-09-25T00:55:05+5:302014-09-25T00:55:05+5:30
रेल्वे स्टेशन व परिसरामधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते.

रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमणावर कारवाई
नवी मुंबई : रेल्वे स्टेशन व परिसरामधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. याविषयी लोकमतने वृत्त प्रसिद्ध करताच सिडकोच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी कारवाई करून सर्व अतिक्रमण हटविले.
सिडकोने सर्व रेल्वे स्टेशनमध्ये खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्टॉल दिले आहेत. परंतु यामधील काही स्टॉलचालकांनी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केले आहे. नेरूळ, सानपाडामध्ये नागरिकांना ये - जा करण्यासाठी असलेल्या जागेमध्ये खुर्च्या, टेबल टाकण्यात आले आहेत. रेल्वे स्टेशनबाहेरील किआॅस्कवाल्यांनीही मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केले आहे.
याविषयी लोकमतने आवाज उठविला होता. हॉटेलचालक अनेक ठिकाणी कचरा करत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनीही केली होती.
सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सर्व ठिकाणच्या अतिक्रमणावर कारवाई केली आहे. हॉटेल चालकांनी तयार केलेले शेड काढण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनमध्ये स्टॉलचालकांनी बसविलेल्या इतर विक्रेत्यांनाही हटविण्यात आले आहेत.
(प्रतिनिधी)