Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या बेशिस्त डॉक्टरवर वेतन कपातीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 14:47 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या मीरारोड येथील भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालयातील बालरोगतज्ञ डॉ. साजिद मुसाणी यांच्यावर वेतन कपातीची कारवाई झाली आहे.

- राजू काळे भार्इंदर- मीरा-भार्इंदर महापालिकेच्या मीरारोड येथील भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालयातील बालरोगतज्ञ डॉ. साजिद मुसाणी यांच्यावर वेतन कपातीची कारवाई झाली आहे. वरीष्ठांना न कळविताच सतत १५ दिवस गैरहजर रहात असल्याने त्यांच्या या बेशिस्त वर्तनामुळे त्यांच्यावर आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी वेतन कपातीची कार्यवाही केली आहे.

इंदिरा गांधी रुग्णालयात कार्यरत असलेले बालरोगतज्ञ डॉ. मुसाणी हे वरीष्ठांच्या आदेशाला न जुमानता आपला मनमानी कारभार करीत असल्याच्या तक्रारी अनेकदा आयुक्तांकडे आल्या होत्या. तसेच पालिकेच्या रुग्णालयात रुग्णसेवा देत असताना ते खाजगी रुग्णसेवेलाच प्राधान्य देत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. ते बालरोग तज्ज्ञ असल्याने अलिकडेच भारतरत्न स्व. पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कुपोषित बालक उपचार कक्षातील बाल रुग्णांवरील उपचाराची जबाबदारी आयुक्तांनी त्यांच्यावर सोपविली आहे, असे असतानाही त्यांनी अद्याप या कक्षात हजेरी लावलेली नाही. वरीष्ठांनी त्याचा जाब विचाराताच त्यांना उद्धट उत्तरे दिली जात असल्याने त्यांच्या या बेशिस्त वर्तनाला कंटाळलेल्या वरीष्ठांनी आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्तांनी सुरुवातीला त्यांच्या विनापरवानगी

गैरहजेरीच्या कालावधीतील वेतन कपात करण्याचा आदेश वैद्यकीय विभागाला गुरुवारी दिला आहे. तरीदेखील डॉ. मुसाणी यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे वैद्यकीय विभागाचे प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांनी सांगितले.