लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई
By Admin | Updated: June 4, 2015 05:11 IST2015-06-04T05:11:49+5:302015-06-04T05:11:49+5:30
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लाच मागणाऱ्या जात पडताळणी विभागाच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई
नवी मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लाच मागणाऱ्या जात पडताळणी विभागाच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पालघर युनिटने मंगळवारी सीबीडी येथे ही कारवाई केली.
पालघर येथील मनोर गावच्या रहिवाशाच्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी सन २००८ मध्ये सीबीडी येथील जात पडताळणी कार्यालयात अर्ज केला होता. यानुसार त्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी देखील झाली. मात्र अद्यापपर्यंत त्यांनी प्रमाणपत्र स्वीकारले नसल्याने ते कार्यालयातच पडून होते. हे प्रमाणपत्र तिथे कंत्राटी काम करणाऱ्या अभिलेखापाल सिकंदर तांबोळी याच्या हाती लागले होते. त्यानुसार तांबोळी याने संबंधिताला परस्पर संपर्क साधून प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी केली. या प्रमाणपत्रासाठी त्याने प्रथम ८ हजार रुपयांची मागणी केली. नंतर त्यात तडजोड करून ५ हजार रुपये मागितले होते. याची तक्रार अर्जदाराने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केली. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११.२५ सीबीडी, कोकण भवन येथील जात पडताळणी कार्यालयात पोलीस उपअधीक्षक संजय मोहिते यांच्या पथकाने सापळा रचला होता.