Join us

दादर येथे अवैध दारू साठ्यांवर कारवाई,

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 20:51 IST

हरियाणा येथील स्वस्त विदेशी दारूची अवैध वाहतूक करून दादर येथे आणली जात असताना त्यावर राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र भरारी पथकाने कारवाई केली.

श्रीकांत जाधव 

मुंबई : हरियाणा येथील स्वस्त विदेशी दारूची अवैध वाहतूक करून दादर येथे आणली जात असताना त्यावर राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपीला अटक असून १ लाख ६३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पंजाब एक्सप्रेस मेल रेल्वे गाडीने दोन व्यक्ती हरियाणा राज्यातील स्वस्त परदेशी स्कॉच दारूची छुपी वाहतूक करून दादर येथे आणत आहेत. त्यावर उत्पादन शुल्क महाराष्ट्र भरारी पथकाचे निरीक्षक विजयकुमार थोरात तसेच रियाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून दादर रेल्वे स्थानकाबाहेर कारवाई करण्यात आली. 

या कारवाईत दिनेश दोडेजा व संतोष तांबे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून परदेशी दारूच्या ४९ सिलबंद बाटल्या ४ हॅन्डबॅन्ग असा १ लाख ६३ हजार ७०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  या कारवाईत महाराष्ट्र भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक  प्रकाश दाते, अनिल जाधव, सोमनाथ पाटील, दीपक कळवे आदी अधिकारी कर्मचार सहभागी होते.