Join us

दादरच्या हनुमान मंदिरावरील कारवाईला अखेर स्थगिती; आमदार मंगलप्रभात लोढा यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 05:41 IST

स्थगिती नको, आदेशच रद्द करा : उद्धवसेना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दादर पूर्व येथील मध्य रेल्वेच्या १२ नंबर फलाटालगतच्या हनुमान मंदिरावरील कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत आपण स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधला. या संदर्भातील स्थगिती आदेश आपल्याला मिळाल्याची माहिती भाजपचे आ. मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी दिली.

दुसरीकडे, केवळ कारवाईला स्थगिती नको, कारवाईचा निर्णयच रद्द करा, अशी मागणी उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली, तर या प्रकरणावरून उद्धवसेना आणि भाजप यांच्यात कलगीतुरा रंगला असून दोन्ही पक्षांनी मंदिरात महाआरती केली. लोढा यांनी हनुमान मंदिराला भेट देऊन मंदिराच्या विश्वस्तांशी संवाद साधला आणि महाआरती केली. यावेळी आ. कालिदास कोळंबकर यांच्यासह बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषदचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. लोढा यांनी आ. आशिष शेलार यांच्या समवेत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली. त्यानुसार, कारवाई स्थगित करण्यात आली असल्याचे लोढा यांनी सांगितले. मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या सहायक विभागीय अभियंत्यांनी दादर येथील मध्य रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक १२ च्या पूर्वेकडील आरपीएफ ऑफिसच्या मागे असलेल्या अनधिकृत मंदिराला सात दिवसांची नोटीस दिली होती. मात्र, नोटीसच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

सोमय्यांना पाहताच उद्धवसेना आक्रमक

उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हनुमान मंदिरामध्ये आरती करण्यासाठी येणार होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. याचवेळी भाजप नेते किरीट सोमय्या मंदिरात आले. त्यांना पाहताच शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी विरोधात घोषणाबाजी करीत सोमय्यांना मंदिराबाहेर काढण्याची मागणी केली. यावेळी भाजप आणि उद्धवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून होते. पंरतु, सोमय्यांना सुरक्षित मंदिराबाहेर आणले. दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे पुन्हा हिंदुत्वाचा आधार घेत आहेत. हनुमान चालीसा वाचणाऱ्यांना त्यांनी जेलमध्ये टाकले होते. त्यामुळे आता त्यांना हनुमानाच्या चरणी जावे लागत आहे, अशी टीका किरीट सोमय्या यांनी यावेळी केली.

राजकीय नाट्य हनुमान मंदिर तोडण्याबाबत रेल्वेच्या नोटीसीवरून दिवसभर राजकीय नाट्य सुरू होते. कारवाईच्या विरोधात उद्धवसेनेने संध्याकाळी महाआरतीचे आयोजन करताच भाजपने दुपारीच कारवाईला स्थगिती मिळवत आंदोलनाची हवा काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नोटीसच रद्द व्हायला पाहिजे अशी आग्रही मागणी उद्धवसेनेने लावून धरली. भाजपने दुपारी तर उद्धव सेनेने संध्याकाळी महाआरती केली.

केंद्र आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचे आणि लोकांचे ऐकणारे सरकार आहे. हिंदू समुदायाची या मंदिराबाबतची भावना आम्ही जाणतो. त्यामुळे धार्मिक आस्थेच्या विषयाचे राजकारण करण्याचा काहींचा मानस सफल होण्याआधीच आम्ही मंदिर वाचविण्यात यशस्वी झालो. - मंगल प्रभात लोढा, आमदार, भाजप

हिंदूंच्या ८० वर्षे जुन्या मंदिराला कारवाईची नोटीस दिली होती, यावरून तुमची इच्छा काय आहे हे दिसून येते. हिंदू म्हणता आणि आम्हाला विचारात घेत नाही. कसला आणि कोणाचा विकास करत आहात ? मंदिराचा कुठे अडथळा होत आहे? ही मोक्याची जागा असून, त्याची करोडो रुपये किंमत आहे. त्यामुळे मंदिर तोडून इथे मॉल बांदायचा आहे की ही जागाच विकायची आहे ? - प्रकाश कारखानीस, विश्वस्त, हनुमान मंदिर

 

टॅग्स :मारुतीदादर स्थानक