दलाल आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा
By सचिन लुंगसे | Updated: May 22, 2024 19:42 IST2024-05-22T19:41:28+5:302024-05-22T19:42:00+5:30
अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधातही कारवाई करण्यात आली.

दलाल आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा
मुंबई : मध्य रेल्वेच्या आरपीएफ विभागाने तिकिटांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासह प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी दलालांविरुद्धची मोहीम तीव्र केली असून, खासगी ट्रॅव्हल एजन्सींना लक्ष्य करून छापे टाकले. एप्रिलमध्ये आरपीएफने दलाली विरूध्द २७ प्रकरणे नोंदवली. २१ जणांना अटक करत ४५२ तिकिटे जप्त केली. त्याची किंमत १३ लाख ५५ हजार १०७ रुपये असून, गुन्हेगारांकडून ९ हजार रोख रुपये जप्त करण्यात आले. तर अधिकृत स्त्रोतांकडून वैध रेल्वे तिकीट खरेदी करण्याचे आवाहन कारवाईनंतर प्रवाशांना करण्यात आले आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधातही कारवाई करण्यात आली. फेरीवाला विरोधी पथकाने रेल्वेच्या जागेवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना एप्रिलमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध ९२४ गुन्हे नोंदवले. ९२२ जणांना अटक करण्यात आली. ७३५ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांच्याकडून ७ लाख ६९ हजार ३८० रुपये दंड वसूल करण्यात आला. ९ जणांना तुरुंगात टाकण्यात आले. शिवाय तंबाखूच्या वापराविरुद्ध कारवाई करण्यात आली. भारतीय रेल्वे कायदा आणि सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्या अंतर्गत ६४ प्रकरणे नोंदवली. याद्वारे १२ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. रेल्वेच्या आवारात कोणत्याही स्वरूपात तंबाखूचा वापर टाळण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.