मुंबई : कोस्टल रोडचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याने उत्तरेकडील दुसऱ्या टप्प्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यापासून दहिसरपर्यंत प्रस्तावित असलेल्या या रस्त्यासाठी मंजूर विकास आराखडा २०३४ मध्ये फेरबदल, तसेच त्याला सरकारच्या नगरविकास विभागाची मंजुरी आवश्यक आहे. पालिकेने मालाड, पहाडी गोरेगाव, चारकोप, बोरीवली, एक्सर, दहीसर, मालवणी येथील ६० भूखंडांना आरक्षण बदलाची नोटीस बजावली असून, त्याचे लवकरच संपादन केले जाणार आहे.
कोस्टल रोड (उत्तर)च्या टप्प्याचे काम पालिकेच्या पूल विभागाकडे आहे. वांद्रे-वर्सोवा सी-लिंकच्या शेवटी असलेल्या वर्सोवा इंटर वेजपासून ते दहीसर येथील दहीसर इंटरचेंजपर्यंत आणि गोरेगाव-मुलुंड पूर्व-पश्चिमचा ४.४६ किलोमीटर लांब जोडरस्ता, असे काम पूल विभागाने प्रस्तावित केले आहे. पूल विभागाने सल्लागारामार्फत सर्वेक्षण करून या रस्त्याचा आराखडा अंतिम केला आहे.
महिनाभराची मुदत पश्चिम उपनगरातील विविध विभागीय कार्यालयांत या बदलांसंबंधित नकाशा पालिकेने ठेवला आहे.आरक्षण बदलाची सूचना पालिकेने जाहीर केल्यानंतर नागरिक, संस्था यांनी महिनाभरात आपल्या सूचना किंवा हरकती सादर कराव्यात. त्यानंतर येणाऱ्या सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
११.३६ किमी लांबीचा कोस्टल रोड मुंबईतील उत्तरेकडील उपनगरांत वाहतूक सुधारण्यासाठी ‘कोस्टल’चा दुसरा टप्पा महत्त्वाचा आहे. या अंतर्गत गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यापासून दहीसरपर्यंतच्या ११.३६ किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. ३.५४ किमी लांबीचा व कनेक्टर इंटरचेंजचा अंतर्भाव सध्याच्या आराखडा २०३४ करणे आवश्यक आहे.