आरोपी विक्रम भावेचा जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:06 IST2021-05-07T04:06:20+5:302021-05-07T04:06:20+5:30
दाभोलकर हत्या प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपी असलेला विक्रम भावे याचा जामीन उच्च ...

आरोपी विक्रम भावेचा जामीन मंजूर
दाभोलकर हत्या प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपी असलेला विक्रम भावे याचा जामीन उच्च न्यायालयाने गुरुवारी मंजूर केला.
दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी सचिन अंदुरे व शरद कळस्कर यांनी बंदुकीची गोळी झाडून हत्या केली. विक्रम भावे याने रेकी करून या दोघांना मदत केली. तसेच त्यांना बाहेर पडण्याचा मार्गही दाखवला, असा आरोप पोलिसांनी भावेवर केला आहे.
न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांनी भावे याचा जामीन मंजूर करत त्याला एक लाख रुपयांचा जातमुचलक्यावर साेडण्याचे आदेश दिले. तसेच त्याला पुणे पोलीस ठाण्यात दरदिवशी हजेरी लावण्याचे व त्यापुढील दोन महिने महिन्याच्या दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे, खटल्याला उपस्थित राहण्याचे व कोणत्याही साक्षीदारावर दबाव न आणण्याचे तसेच कोणतेही बेकायदेशीर कृत्य न करण्याचे निर्देश दिले.
सीबीआयचे वकील संदेश पाटील यांनी या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली. परंतु, न्यायालयाने ती फेटाळली.
कळस्कर याने दिलेल्या जबाबानंतर सीबीआयने भावे याला, ॲड. संजीव पुनाळेकर यांना २५ मे २०१९ रोजी अटक केली. पुनाळेकर यांना पुण्याच्या सत्र न्यायालयाने जून २०१९ मध्येच जामीन मंजूर केला. मात्र, भावे याचा पुणे न्यायालयाने जामीन नांमजूर केल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, दाभोलकर यांची हत्या ज्या बंदुकीने करण्यात आली ती नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकर याने कळस्कर याला दिला. पुनाळेकर यांचा मदतनीस भावेने घटनास्थळाची रेकी केली आणि आरोपींना पळण्याचा मार्गही दाखवला.
.....................