आरोपावरून कर्मचाऱ्याला डांबले

By Admin | Updated: June 22, 2015 02:25 IST2015-06-22T02:25:17+5:302015-06-22T02:25:17+5:30

हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करणाऱ्या कामगाराला त्याच हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरने तीन दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार वाशीत घडला आहे.

The accused stabbed the employee | आरोपावरून कर्मचाऱ्याला डांबले

आरोपावरून कर्मचाऱ्याला डांबले

नवी मुंबई : हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करणाऱ्या कामगाराला त्याच हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरने तीन दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार वाशीत घडला आहे. त्याच्यावर चोरीचा आरोप घेत मारहाण करून हॉटेलच्या स्टोअर रूममध्ये त्याला डांबून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी कामगाराने वाशी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
कामोठे येथे राहणाऱ्या प्रमोद गायकवाड (२५) या तरुणाने तो काम करीत असलेल्या फोर पॉइंट हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरविरोधात तक्रार केली आहे. उदय सिंग असे या
सिक्युरिटी मॅनेजरचे नाव आहे. हॉटेलमध्ये सफाईचे काम करणाऱ्या प्रमोद याने हॉटेलमधून आयपॅड चोरल्याचा संशय सिंग याला होता. यानुसार १७ जून रोजी संध्याकाळी तो कामावरून घरी जात असताना त्याने चौकशी केली. परंतु गायकवाड याने चोरीचा आरोप धुडकावल्याने सिक्युरिटी मॅनेजर सिंग याने त्याला थांबवून ठेवले होते.
त्यानंतर रात्रभर डांबून ठेवून आपल्याला मारहाणदेखील झाल्याचे गायकवाड याचे म्हणणे आहे. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा काम संपल्यावर घरी जात असताना अडवणूक करून त्याला हॉटेलच्याच स्टोअर रूममध्ये डांबून ठेवण्यात आले होते. या तीन दिवसांत प्रमोद गायकवाड हा घरी न गेल्यामुळे त्याच्या कुटुंबातील व्यक्ती त्याला मोबाइलवर संपर्क साधत होत्या. परंतु त्याचा फोनदेखील सिंगच्या ताब्यात असल्याने त्यांचा संपर्क झाला नव्हता. याचाही प्रचंड मनस्ताप आपल्या कुटुंबाला झाल्याचे गायकवाड याचे म्हणणे आहे. अखेर शुक्रवारी १९ जून रोजी रात्री त्याला हॉटेलमधून घरी सोडण्यात आले. या कालावधीत वेळेवर जेवणदेखील न मिळाल्याने त्याची उपासमार झाली आहे.
अखेर शनिवारी दुपारी गायकवाड याने वाशी पोलिसांकडे यासंबंधीची तक्रार केली. त्यानुसार सिंग याच्याविरोधात अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल केला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम पाठारे यांनी सांगितले. मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नसून, वाशी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The accused stabbed the employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.