Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी निर्दोष असून, १८ वर्षे कारागृहातच; ७/११ प्रकरणी बचावपक्षाचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 05:32 IST

आरोपींना दोषमुक्त करण्याची मागणी ज्येष्ठ वकील एस. मुरलीधर यांनी न्या. अनिल किलोर व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे केली.

 मुंबई : ११ जुलै २००६ रोजी झालेल्या लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी निर्दोष आहेत. मात्र, गेली १८ वर्षे कारागृहातच आहेत, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलाने सोमवारी उच्च न्यायालयात केला. 

आरोपींना दोषमुक्त करण्याची मागणी ज्येष्ठ वकील एस. मुरलीधर यांनी न्या. अनिल किलोर व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे केली. फाशी झालेल्या दोन आरोपींच्यावतीने अॅड. मुरलीधर यांनी न्यायालयाला सांगितले की, तपासयंत्रणांनी एक पॅटर्न केला आहे. त्यानुसार, दहशतवाद संबंधित प्रकरणांचा तपास करताना तपासयंत्रणा 'जातीय पक्षपात' करतात. 

लोकल ट्रेन बॉम्बस्फोटांप्रकरणी सुनावलेल्या शिक्षेविरोधात आरोपींनी, तर पाचजणांची जन्मठेपेची शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या अपिलावरील सुनावणी गेली पाच महिने दैनंदिन स्वरूपात खंडपीठापुढे सुरू आहे. मुंबईच्या पश्चिम रेल्वेच्या सात वेगवेगळ्या लोकलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. त्यात १८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक जखमी झाले.

- सप्टेंबर २०१५ मध्ये विशेष न्यायालयाने बॉम्बस्फोटांप्रकरणी १२ जणांना दोषी ठरवत पाचजणांना फाशीची शिक्षा ठोठावली, तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. -  अपिलावरील सुनावणीत मुरलीधर यांनी म्हटले की, तपास पक्षपातीपणे करण्यात आला आहे. निर्दोष लोकांना कारागृहात पाठविले आहे. काही वर्षांनी त्यांना पुराव्याअभावी निर्दोष ठरविण्यात येईल म्हणजे त्यांच्या आयुष्याचे पुनर्वसन होण्याची शक्यता नाही, असा युक्त्तिवाद मुरलीधर यांनी केला. - गेली १८ वर्षे आरोपी कारागृहातच आहेत. अटक केल्यापासून एक दिवसही ते कारागृहाच्या बाहेर आलेले नाहीत. आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा कारागृहात गेला आहे. असा युक्तिवाद मुरलीधर यांनी केला. आता या प्रकरणावर मंगळवारीही सुनावणी होणार आहे.

टॅग्स :न्यायालयतुरुंगमुंबई