काँग्रेस चिंतन बैठकीत आरोप-प्रत्यारोप
By Admin | Updated: November 5, 2014 00:10 IST2014-11-05T00:10:59+5:302014-11-05T00:10:59+5:30
पालघर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघापैकी पालघरमध्ये राजेंद्र गावित यांचा अपवाद वगळता एकाही उमेदवाराला तीस हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही

काँग्रेस चिंतन बैठकीत आरोप-प्रत्यारोप
दिपक मोहिते, वसई
पालघर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघापैकी पालघरमध्ये राजेंद्र गावित यांचा अपवाद वगळता एकाही उमेदवाराला तीस हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही. काँग्रेसचा एकही उमेदवार या जिल्ह्यात विजयी झाला नाही. हे राजकीय वास्तव असतानाही पराभवावर चिंतन करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत चिंतन होण्या ऐवजी चिंताजनक वाटावे असे आरोप-प्रत्यारोपांचे युद्धच घडून आले. एका पदाधिकाऱ्याने पक्षाच्या अधिकाऱ्यांनी विरोधकांकडून पैसे खाऊन स्वपक्षाचे उमेदवार पाडले असा खळबळजनक आरोप करताच सभेतील सगळेच खवळले. तर माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी सभात्याग केला त्यामुळे ही बैठक मनोमिलना ऐवजी रणकंदन घडविणारी ठरली.
वसई व पालघर मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर पक्षाने चिंतन बैठका घेतल्या परंतु या बैठकीमध्ये चिंतन होण्याऐवजी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या. तरीही पुन्हा पक्षाला बळ द्यायचा निर्णय घेण्यात आला. वसई येथे झालेल्या बैठकीत एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने गंभीर आरोप केल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांचा संताप अनावर झाला होता. तर पालघर येथे एका गटाने पक्षबांधणीकडे लक्ष न दिल्यामुळे पराभव झाल्याचा आरोप केला.
राज्यात दारूण पराभव झाल्यानंतरही काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वागण्यात फरक पडलेला नाही. पक्षात झालेल्या पराभवाबाबत चिंतन तसेच पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी वसई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी चिंतनाऐवजी एकमेकांवर आरोप करण्याचे सत्र सुरू ठेवले. एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने आपल्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडून पैसे घेतल्याचा आरोप केल्यामुळे उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा संताप अनावर झाला व त्यांनी कोणी पैसे घेतली असतील त्यांची नावे जाहीर करा म्हणून त्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मागे तगादा लावला परंतु त्या पदाधिकाऱ्यांची नावे मात्र त्यांनी शेवटपर्यंत सांगितली नाहीत. उलट ज्या पदाधिकाऱ्याने आरोप केला होता त्या पदाधिकाऱ्यालाच तू प्रचार न करता घरी झोपून राहीलास असा घरचा आहेर मिळाला. पालघर येथेही झालेल्या चिंतन बैठकीमध्ये चिंतनाऐवजी आरोपाच्या फैरी झडल्या. पक्षाचे उमेदवार व तत्कालीन आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनाही एका गटाच्या रोषाला सामोरे जावे लागले. पक्षबांधणीला महत्व न देणे व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे अशा नीतीमुळे पक्षाचा पराभव झाल्याचा आरोप करण्यात आला. एकंदरीत बैठकीतील वातावरण लक्षात घेऊन गावित यांनी बैठकीतून निघून जाणे पसंत केले.
पालघर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात काँगे्रस पक्षाच्या उमेदवारांचा दारूण पराभव झाला. राजेंद्र गावित यांचा अपवाद वगळता एकाही उमेदवाराला ३० हजाराचा पल्ला गाठता आला नाही. बोईसर येथे देण्यात आलेल्या उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे या उमेदवाराच्या प्रचारापासून काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दूर राहणे पसंत केले. वसई व नालासोपाऱ्यामध्येही अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या उमेदवाराचा प्रचार करणे टाळले. या सर्व घडामोडीवरून काँग्रेसला पुन्हा पक्षबांधणीकडे लक्ष द्यावे लागणार आहे हे स्पष्ट होते. पालघर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील हेवेदावे हे पक्षबांधणीच्या मार्गातील प्रमुख अडथळे आहेत. परंतु आजवर एकाही वरीष्ठ नेत्याने त्यावर उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही केली नाही. पालघर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ५ वर्षात भेटी देऊनही काँग्रेस पक्षाला बळकटी येऊ शकली नाही. एवढे महाभारत घडून गेल्यानंतरही काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मानसिकतेत बदल होऊ शकला नाही हे या चिंतन बैठकीवरून स्पष्ट झाले आहे.