अपघात तांत्रिक समस्येमुळे ?

By Admin | Updated: July 6, 2015 03:31 IST2015-07-06T03:31:34+5:302015-07-06T03:31:34+5:30

चर्चगेट स्थानकात जलद लोकल बफरला आदळून अपघात झाला होता. लोकलमधील ब्रेकमध्ये बिघाड झाल्यानेच ही घटना घडल्याचे मोटरमनकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

Accidental Technical Problems? | अपघात तांत्रिक समस्येमुळे ?

अपघात तांत्रिक समस्येमुळे ?

मुंबई : चर्चगेट स्थानकात जलद लोकल बफरला आदळून अपघात झाला होता. लोकलमधील ब्रेकमध्ये बिघाड झाल्यानेच ही घटना घडल्याचे मोटरमनकडून वारंवार सांगण्यात येत आहे. या अपघाताची चौकशी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असून, ती पुढील आठवड्यात पूर्ण होणार आहे. दरम्यान, ज्या लोकलचा अपघात झाला, तशाच प्रकारच्या दोन लोकलच्या ब्रेकमध्ये याआधी तांत्रिक समस्या उद्भवली होती आणि ही बाब रेल्वे प्रशासनाला सांगण्यात आली होती. त्यामुळे अपघात झालेल्या लोकलमध्येच काही तांत्रिक समस्या असू शकते, असा अंदाज मोटरमन संघटनेकडून वर्तविण्यात येत आहे.
चर्चगेट स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर येणाऱ्या जलद लोकलने बफरला धडक दिली आणि लोकलचा पहिला डबा प्लॅटफॉर्मच्या वर आला. यात एका डब्यासह ओव्हरहेड वायर, प्लॅटफॉर्म आणि बफरचे नुकसान झाले. तसेच मोटरमनसह पाच प्रवासीही जखमी झाले. या लोकलचीही तपासणी करावी, अशी मागणी मोटरमनकडूनही करण्यात आली आहे. अशाच प्रकारे लोकलचा ब्रेक न लागण्याच्या घटना जूनमध्ये घडल्या होत्या. जूनच्या २२ आणि २४ तारखेला दोन लोकलमध्ये हे बिघाड झाल्याचे वेस्टर्न रेल्वे मोटरमन असोसिएशनचे संस्थापक सदस्य बी. एस. रथ यांनी सांगितले. या दोन लोकल आणि चर्चगेट स्थानकात ज्या लोकलचा अपघात झाला ‘ती’ लोकल एकाच सीरिजमधील आहेत. या सर्व लोकल डीसी मोटर ट्रॅक्शनमधील असल्याचे रथ म्हणाले. यामुळे चर्चगेटमधील घटनेकडे रेल्वेने एकतर्फी विचार न करता सगळ्या बाजूने विचार केला पाहिजे, असे रथ म्हणाले.
याबाबत पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार म्हणाले की, पुढील आठवड्यात चौकशी पूर्ण होईल, तेव्हाच अहवालातून सर्व गोष्टी बाहेर येतील.

मुद्दा बफरचा
चर्चगेट स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील बफरला लोकल धडकली. यात बफरचे आणि लोकलचे नुकसान झाले. मुळात लोकलचा बफर आणि प्लॅटफॉर्मवरील बफर हे समोरासमोर आणि एकाच रेषेत नसल्याने अपघाताचे स्वरूप मोठे झाले, असे सांगण्यात येत आहे. चर्चगेट स्थानकातील रूळ हे वर करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकलचा बफर आणि प्लॅटफॉर्मवरील बफर एकाच रेषेत आले नसल्याने अपघात मोठा झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Accidental Technical Problems?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.