खराब रस्त्यांमुळे दुर्घटनांचा धोका : सर्वपक्षीय एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:40 IST2019-01-19T00:40:08+5:302019-01-19T00:40:11+5:30
ठेकेदारावर थेट गुन्हा नोंदविण्याची मागणी

खराब रस्त्यांमुळे दुर्घटनांचा धोका : सर्वपक्षीय एकवटले
मुंबई : घाटकोपर येथे गुरुवारी झालेल्या रस्ते अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाल्याचे तीव्र पडसाद पालिका महासभेत आज उमटले. रस्ता खराब असल्यामुळेच असे अपघात होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. अशा प्रकरणात संबंधित ठेकेदाराला केवळ काळ्या यादीत न टाकता त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी याबाबत महासभेत हरकतीचा मुद्दा मांडला. या मुद्द्याचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन करीत संबंधित कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. त्याचबरोबर करोडो रुपये खर्च केल्यानंतरही अनेक ठिकाणी अल्पावधीतच रस्त्यांची चाळण होऊन रस्ते खड्ड्यात गेले आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, अशी नाराजी नगरसेवकांनी व्यक्त केली.
अपघाताला प्रशासन व निकृष्ट बांधकाम करणारे ठेकेदार जबाबदार असल्याने गुन्हा नोंद करावा. संबंधित कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. अशा अपघातांना जबाबदार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून काही साध्य होत नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली.
सात वर्षांत १५ हजार कोटी खर्च
२०१५ ला कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांचे काम करण्यात आले. २०१६ मध्ये हे रस्ते वाहून गेले. प्रशासनाचे याकडे लक्ष वेधूनही आतापर्यंत काही झालेले नाही. याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. तर सात वर्षांत रस्ते बांधकामांसाठी तब्बल १५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र अल्पावधीतच रस्त्यांची दुर्दशा झाली, असे सांगत रस्त्यावरील खड्डे हे आता नेहमीचेच दुखणे झाले असल्याचे काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू यांनी सांगत सभागृहाचे लक्ष वेधले.
अहवाल सादर करावा... : घाटकोपर येथील दुर्घटनेत संबंधित कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याबाबत प्रशासनाने विचार करावा. अशा घटनांबाबत धोरण ठरवून प्रशासनाने निर्णय घ्यायला हवा, असे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला दिले.